

नाशिक : बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बालकल्याणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची दखल घेऊन बालस्नेही पुरस्कार देण्यात येतो. सन २०२४ साठी बालकल्याणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांसाठी देण्यात येणारा पुरस्कार उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने महिला व बाल विकास विभागासह शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार मिळणाऱ्या मित्तल राज्यातील एकमेव मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. सन २०२३ मध्येही त्यांना हा पुरस्कार देण्यात आला हाेता. सोमवार, दि. 3 मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.