नाशिक : जिल्हा परिषदेतील रखडलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकारीपदी पदोन्नतीला सोमवारी (दि.१८) मुहूर्त लागला खरा. मात्र, सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अनिल गिते यांनी भलताच पुढाकार घेतल्याने ऐनवेळी ही प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी संबंधित गिते यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
जिल्हा परिषदेतील आठ वरिष्ठ सहायक हे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरले होते. यात दोन महिला, तर सहा पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश होता. समुपदेशनाने ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार सोमवारी (दि.18) रोजी ही प्रक्रिया राबविण्यात येणार होती. प्रशासनाने १२ ऑगस्टला पत्र काढून या आठ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी पाचारण केले होते. मात्र, सोमवारी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एका कर्मचाऱ्याने हरकत नोंदविल्याने ही प्रक्रिया ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पवार यांनी गिते यांना चांगलेच सुनावले.
25 जुलैच्या शासन आदेशानुसार पदोन्नती राबविण्याबाबत संबंधिताने हरकत घेतली. त्यामुळे हा शासन आदेश निघून 20 दिवस झाले होते. त्यावर, गिते यांनी फाईलमध्ये उल्लेख का केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, एका महिला कर्मचाऱ्याला पदोन्नतीने मुख्यालयातच विराजमान करण्यासाठी गिते यांनी स्वारस्य दाखविल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, सोयीच्या पदस्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा रंगली आहे. संबंधित कर्मचारी हरकत नोंदविणार असल्याची ओरड गत आठवड्यापासून करण्यास सुरुवात झाली होती. पदोन्नतीच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्याने दाखविलेले धाडस अंगाशी आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी नेमकी काय कारवाई करणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील सहायक प्रशासन पद रिक्त झाल्यावर लागलीच, विभागाने तेथे अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. मात्र, बांधकाम विभाग एकमध्ये वरिष्ठ सहायक हे पद फेब्रुवारीत रिक्त होऊनही ते पद तीन महिने रिक्त ठेवले होते. बांधकाम विभाग तीनमध्ये वरिष्ठ सहायक यांची नियुक्ती केली. परंतु, तो न्यायालयीन वाद असल्याचे दाखविण्यात आले होते. अंतर्गत टेबल बदलण्यातही नियमबाह्य पद्धतीने ठराविक कर्मचाऱ्यांना विभाग, टेबल देण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून होऊ लागली आहे.
कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रीया सोमवारी आयोजित केली असता एका कर्मचाऱ्याने हरकत नोंदविली. त्यामुळे ही प्रक्रीया स्थगित केली असून पुढील आठवड्यात ही प्रक्रीया राबविली जाणार आहे.
दीपक पाटील, प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.