

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानांतर्गत रविवारी (दि. १४) होणारा एकल महिला पुनर्विवाह परिचर मेळावा रद्द करण्यात आलेला असतानी, मेळावा रद्दचा निरोप वेळात न पोहचल्याने मेळाव्यासाठी अनेकांनी नवीन प्रशासकीय इमारती जवळ गर्दी केली. अगदी जळगाव, नंदुरबार, चाळीसगाव यासह नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक येथे दाखल झाले होते. मेळावा स्थगित केल्याचा निरोप न मिळाल्याचे सांगत, उपस्थितांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळावर लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मोठ्या झुमधडाक्यात एकल महिला पुनर्विवाह परिचर मेळावा घेत असल्याची घोषणा केली. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी देखील केली. नाव नोंदणीही प्रशासनाने केली. या नोंदणीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि तब्बल आठ हजारांवर वरांनी नोंदणी केली. गुजरात राज्यातून देखील नोंदणी झाली. परंतू, यात महिलांची संख्या अगदीच नगण्य होती. प्रशासनाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडले. त्यावर प्रशासनाला रविवारचा मेळावा स्थगित करण्याची नामुष्की ओढविली.
प्रशासनाने मेळावा स्थगित करत, त्याचे नियोजन (ग्रुप) तयार करुन भविष्यात ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणार असल्याचे घोषीत केले. याबाबत, प्रशासनाने नोंदणी करणा-यांना निरोप दिले, तर, मेळावा स्थगितची माहिती ही जाहिरातीच्या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न केला. परंतू, मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे या जाहीरातीच्या तुलनेत मेळावा स्थगित ची जाहीराताचा फारसा प्रसार झाला नाही. परिणामी, रविवारी मेळाव्यासाठी त्र्यंबक रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ लोकांची मोठी गर्दी झाली होती. जळगाव, चाळीसगाव, सटाणा, मालेगाव, अहिल्यानगर येथून मोठया प्रमाणावर मेळाव्यासाठी लोक आले होते. मेळावा स्थगित केल्याची माहिती मिळाली नसल्याचे यावेळी लोकांना यावेळी सांगितले. यावर अनेकांनी रोष व्यक्त केला. त्यावेळी तेथे समजूत काढण्यासाठी उपस्थितीत असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच अडचण झाली. त्यामुळे दाखल झालेल्या लोकांची नाव नोंदणी करून घेत त्यांची समजूत काढण्याचा केविलवाणी प्रयत्न केला. एक ते दोन तास हा गोंधळ सुरू होता.
तिघे अधिकारी ठाण मांडून, एकाची दांडी
मेळावा स्थगित केल्याबाबत प्रशासनाने सर्वांना पूर्वकल्पना दिली. खरी, तरी कुणी नवीन प्रशासकीय इमारतीत दाखल झाल्यास त्यांना योग्य माहिती देण्याची जबाबदारी ओमकार पवार यांनी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्यावर सोपविली होती. त्यासाठी चौघांनी रविवारी उपस्थितीत राहण्याचे निर्देश त्यांनी पत्राव्दारे दिले होते. त्यानुसार, डॉ. गुंडे, महेश पाटील व प्रताप पाटील हे रविवारी सकाळपासून तेथे ठाण मांडून होते. आलेल्या लोकांना ते समजून सांगण्याचे काम करत होते. मात्र, उपमुख्यकार्यकारी अधिकारी फडोळ यावेळी अनुस्थित होत्या.
ढिसाळ नियोजनावर संतप्त भावना ... पोराचं लग्न जमत नाही, यात मेळावा होणार असल्याचे रात्रीच आम्हाला नातेवाईकांकडून कळाले. त्यामुळे सकाळी लवकर निघालो. परंतू, येथे आल्यावर मेळावा स्थगित केल्याचे समजले. मेळावा स्थगित करायचा होता तर घेतला कशाला? आमच्या भावनांशी कशाला खेळतात?.
मांगू चिंधा पाटील, चाळीसगाव
मेळावा होणार असल्याची मोठी जाहीरात केली. तशीच स्थगित झाल्याची का केली नाही? मेळावा स्थगित झाल्याचा निरोप वेळात पोहचला नाही. त्यामुळे येथे यावे लागले.
महेंद्र महाजन, जळगाव
सीईंओंनी काढला पळ
मेळाव्याचे नियोजन मुख्यकार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मोठ्या उत्साहात केले. मात्र, नाव नोंदणीस मिळालेल्या प्रतिसादानंतर, मेळावा स्थगित करावा लागला. असे असतानाही रविवारी लोकांनी गर्दी केली. त्यामुळे आलेल्यांची समजूत काढण्याची जबाबदारी पवार यांनी चार अधिकाऱ्यांना सोपविली. यातील तिघे अधिकाऱ्यांनी आदेशाप्रमाणे उपस्थितीत राहून आलेल्यांची समजूत घातली. परंतू, यावेळी नियोजनात अग्रेसर असलेले पवार हेच अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांनी पळ काढल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली होती.
अन् पाटील यांनी घेतला पोलिसांच्या माईकचा ताबा
रविवारी नवीन प्रशासकीय इमारतीबाहेर मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत होते. मेळावा स्थगित झाल्याचे प्रत्येकाला सांगितले जात होते. मात्र, तरी, लोकांचा गोंधळ सुरूच होता. त्यावेळी जिल्हा कार्यक्रकम अधिकारी प्रताप पाटील यांनी थेट पोलिसांच्या व्हॅनमधील माईक हातात घेऊन, लोकांना मेळावा स्थगित असल्याचे सांगत, आवाहन करू लागले.