

जानोरी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी रोडवरील जाधव वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात रुद्र अमोल जाधव (वय ९) या बालकाचा मृत्यू झाला आहे. एकाच महिन्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शनिवारी (दि.31) रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास रुद्र आपल्या आजोबांबरोबर फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी जवळच असलेल्या नालीमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने रुद्रवर झडप घालून त्याला ओढत शेजारी असणाऱ्या ओहळाकडे नेले. आजोबा दत्तू जाधव यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी धाव घेत बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिबट्याने रुद्राला सोडून धूम ठाेकली. त्यानंतर रुद्रला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी रुद्रला मृत घोषित केले. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रुद्रच्या मृत्यूमुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि.31) रोजी रात्री ११ वाजता नाशिक–कळवण–गुजरात या प्रमुख मार्गावर रास्ता रोको करत तीव्र आंदोलन केले. माजी आमदार धनराज महाले तसेच स्थानिक नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला. रास्ता रोकोमुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.