

येवला (नाशिक) : संतोष घोडेराव
सातासमुद्रापार विख्यात असलेल्या पैठणीवर येवल्यातील दिव्यांग कारागीर शक्ती दानेज यांनी एक अनोखी कलाकृती साकारली आहे. पैठणीवर पंतप्रधान मोदी श्रीराम नाव विणत असून, पाठीमागून प्रभू श्रीराम त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असल्याची प्रतिमा त्यांनी पैठणीवर साकारली आहे.
या प्रतिमांसाठी दानेज यांना सुमारे दीड महिन्याचा कालावधी लागला. ही पैठणी सध्या चर्चेचा विषय ठरली असून, लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना ही पैठणी भेट देण्याचा दानेज यांचा मानस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर साकारून कोट्यवधी श्रीराम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले. त्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करण्यासाठी ही विशेष पैठणी विणण्यात आली
सर्वधर्मीय हस्तकलेतून गणरायाची प्रतिमा
जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मुस्लिम महिला विणकाराने गणेशोत्सवात पैठणीवर गणरायाची प्रतिमा साकारली आहे. साहेबराव पगारे यांच्या पैठणीच्या दुकानात भारती पगारे यांच्याबरोबर नाजमीन शेख या मुस्लिम महिलेने पैठणीवर गणेशाची प्रतिमा साकारली आहे. नाजमीन शेख या पगारे यांच्याकडे रोजंदारीवर पैठणी विणकाम करतात. ११ दिवसांमध्ये या पैठणीचे विणकाम पूर्ण झाले. विशेष म्हणजे, या विणकामात नाजमीन शेख या मुस्लिम महिला विणकाराचा सहभाग असल्याने सर्वधर्मीय हस्तकलेतून ही पैठणी तयार झाली आहे. धर्म, जातीच्या पलीकडे जाऊन कलेला एकत्र आणणारा हा प्रयत्न खरी सांस्कृतिक एकात्मतेची ओळख ठरला आहे.