

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दिवंगत नीलेश बारेला या विद्यार्थ्याच्या वारसाला विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेनुसार दीड लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मृत विद्यार्थ्याची पत्नी कविता नीलेश बारेला यांच्याकडे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला.
नीलेश बारेला हा मुक्त विद्यापीठाच्या चोपडा येथील अभ्यासकेंद्र असलेल्या महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याचे १५ एप्रिल २०२५ रोजी अपघाती निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुक्त विद्यापीठाने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना (विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा) कार्यान्वित केलेली आहे. त्यानुसार नीलेशच्या वारसांनी केलेल्या दाव्यानुसार चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून दीड लाख रुपयांचा विमा दावा मंजूर करण्यात आला. याप्रसंगी सदाशिव बारेला, विशाल बारेला, कुलसचिव दिलीप भरड, डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. दयाराम पवार, सिद्धांत टाक, पंजाब नॅशनल बँकेचे मंडल उपप्रमुख अशोक अहुजा, आशिष भिवगडे आदी उपस्थित होते.