

ठळक मुद्दे
नाशिकमधून दरवर्षी ६० टक्के तरुण पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद शहरांकडे स्थलांतरित
अव्यावसायिक शिक्षणक्रमातील ६० टक्के युवा सेवाक्षेत्रात तात्पुरती नोकरी करतात
नाशिकमध्ये जादा वेतनाच्या नोकरीसाठी युवावर्गाला शाश्वत भविष्य नसल्याचे वास्तव
नाशिक : निल कुलकर्णी
नाशिकची वाटचाल देशातील महानगरांमध्ये होत असताना येथील उद्योगांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने नाशिकमधून प्रतीवर्षी ६० टक्के तरुण पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद अशा शहरांकडे नोकरीसाठी स्थलांतरित होत आहेत, अशी माहिती युवा क्षेत्रातील अभ्यासकांनी दिली. अव्यावसायिक शिक्षणक्रमातील ६० टक्के युवा सेवा क्षेत्रात तात्पुरती नोकरी करत असल्याचे निरीक्षणही अभ्यासकांनी नोंदवले आहे.
'युवा आणि शाश्वत भविष्यासाठी कौशल्ये' ही यंदाची संकल्पना आहे. नाशिकमध्ये अधिक वेतनाच्या नोकरीसाठी युवावर्गाला शाश्वत भविष्य नसल्याचे वास्तव तज्ज्ञांच्या निरीक्षणावरुन स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत नाशिकचा शिक्षण, वैद्यकीय सेवा, पर्यटन, उद्योग, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात झपाट्याने विकास होत गेला. मात्र, येथील उद्योगक्षेत्रात तरुणाईला मिळणाऱ्या वेतनावर नजर टाकली तर युवा वर्गाचे भविष्य धुसर असल्याचे वास्तव समाेर आले. १८ ते ३५ वयोगटातील तरुणाईला या शहरात मिळाणारे वेतन अत्यंक कमी असल्याचे निरीक्षण अभ्यासक नोंदवत आहे. १५ ते ६० हजार इतक्या कमी वेतनावर नाशिकचा युवा वर्ग नोकरी करत आहे. चांगले शिक्षण, असूनही अधिक पगारासाठी नाशिकच्या युवावर्गाला येथून पुणे, बंगळुरू, मुंबई अथवा हैद्राबादला जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
विशेष म्हणजे, नाशिकचे युवा नाशिकमध्ये उच्चशिक्षण घेऊन केवळ कमी पगार असल्यामुळे अन्य महानगरात प्रतिवर्षी स्थलांतरीत हाेत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील युवा १५ ते ३० हजारांच्या नोकरीसाठी नाशिककडे येत असल्याचे वास्तवही अभ्यासक व्यक्त करत आहेत.
आयटी, संगणक क्षेत्रात गलेलठ्ठ पगार मिळतो. त्यामुळे नाशिकचा युवा बंगळुरु, मुंबई, पुणे, हैद्राबादला स्थलांतरीत होत आहे. हे प्रमाण ८० टक्केहून अधिक आहे. नाशिकमध्ये मोठे उद्योग प्रकल्प आल्यास स्थापत्य, तंत्र, विदयुत अशा कोअर सेक्टरमध्ये नोकरीची मागणी वाढू शकेल. आता नोकऱ्या कमी आणि उमेदवार जास्त यामुळे नाशिकचे उद्योग अत्यल्प वेतनावर कर्मचारी ठेवत आहेत.
प्रा. अतुल पाटील, के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक.
नाशिकमध्ये - अन्य महानगरात
इंजिनियर - २० ते ५५ हजार तर अन्य महानगरात ८० हजार ते दीड लाख मिळतो.
कर्मचारी - १० ते ३० हजार तर अन्य महानगरात ३५ ते ७० हजार मिळतो.
वयोगट लोकसंख्या ( २०११ चे जनगणनेनुसार)
१५ ते १९ वर्षे- ६,५०,५३९
२० ते २४ वर्षे- ६, ६९,११७
एकूण: १३,१९,७१(स्रोत : CityFacts)
(सन २०२५ मध्ये वरील वयोगट आज २५ ते ३५ वयोगटात आहे)
नाशिकमध्ये मोठे उद्योग नाहीत आणि त्या तुलनेत प्रचंड प्रमाणात शिक्षण घेऊन बाहेर पडणारा युवा आहे. अभियांत्रिकी किंवा व्यावसायिक कोर्स केलेल्या युवावर्गाला पगार कमी असल्याने ते नाशिक सोडून बाहेर जात आहेत. नाशिकचा ७० टक्के अव्यवासायिक कोर्स केलेला युवा सेवा क्षेत्रात १० ते २० हजार रुपयांवर काम करताना दिसतोय.
डॉ. सुधीर संकलेचा, युवा अभ्यासक, नाशिक.
नाशिकचा युवा अन्य शहरात स्थलांतरीत होत असताना महानगरांमध्ये तो संपूर्ण कुटुंब स्थलांतरीत करु शकत नाही. त्यामुळे आई-वडिल नाशिकमध्ये आणि मुले महानगरात नोकरीला अशा स्थितीमुळे ज्येष्ठांना मोठ्या घरात एकट्याला वेळ व्यतीत करावा लागत आहे. झपाट्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे येथील अनेक कुटुंबांमध्ये मनोसामाजिक समस्या निर्माण होत आहे.
उल्का मानकर, लेखिका, अभ्यासक.