

शारीरिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींच्या मनोव्यापारात बिघाड, मानसिक स्वास्थ हरवल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे शारिरीक आजारांचे मुळ रुग्णांच्या मानसिकतेत असल्याने 'मनोकायिक आजारां'मुळे नागरिकांच्या शारिरीक व्याधी वाढल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ नोंदवत आहेत. World Mental Health Day
१) ८० टक्के रुग्ण मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत पोहोचतच नाही.
२) राज्यात केवळ १० ते १२ टक्के लोक मानसिक आजारांवर घेतात उपचार
३) नागरिक शारीरिक दुखण्यासाठी तत्काळ डॉक्टरांकडे जातात तसे मानसिक आजारासाठी जात नाहीत
४) नैराश्य, अस्वस्थता अशा 'सायकोसिस' रुग्णांचे प्रमाण अधिक.
वाढत्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात प्रत्येकालाच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आटापीटा करावा लागत आहे. नातेसंबंध जोपसाताना, कामाच्या ठिकाणी, पालकत्व निभवतांना होणार ताण-तणावात प्रचंड वाढ झाल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले. आपल्याला कुठलातरी मनोआजार असावा आणि त्याचे निदान, उपचार मानसउपचार तज्ज्ञांकडून जाऊन करावे, ही जाणीवच सामान्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागातील लोकांमध्ये अद्यापही नाही. त्यामुळे व्यक्तींमधील वर्तनसमस्या, नैराश्य, भ्रम, भास आणि अस्वस्थता अशा मनोआजाराचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शारिरीक आजाराही बळावले आहेत. अगदी छोट्यातल्या छोट्या न्यूरोसिस आजारांपासून ते स्क्रिझोफेनिया(छिन्नमनस्कता) सारख्या 'सायकोसीस' मनोआजार असणाऱ्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले.
- स्किझोफ्रेनिया १०० मधून एकाला
- बेचैनी (ॲंझायटी) १० ते १५ व्यक्तींना
- नैराश्य २० ते २५ व्यक्तींंना (याचे प्रमाण सर्वाधिक आहे)
- अॉबसेसिव्ह कंम्पसिव्ह डीसअॅार्डर ओसीडी २ टक्के लोकांना
- उन्माद १ ते ५ टक्के, बायपोलर आजार १ ते ३ टक्के.
१५ ते २० टक्के लोकांना हृदयासंबंधी आजार
१० ते १५ टक्के रुग्णांना मधुमेह
१० ते २० टक्के लोकांना श्वसनासंबंधी आजार
शारीरिक आजारांचे निदान केल्यानंतरही त्याचे कारण सापडत नाही. तेव्हा त्याचे मुळ मनोव्यापारात असते. स्पर्धेच्या सध्याच्या युगात मनोकायिक आजार (सायकोसोमॅटीक) चे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. त्यात नैराश्य आणि बेचैनीसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मनो स्वास्थ बिघडल्याने शारीरिक आजारात प्रचंड वाढ झाली.
डॉ. महेश भिरुड, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक.
मनाला शरीरापासून दूर ठेऊन उपचार करता येत नाही. मानसिक तणावामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. आमच्याकडे समुपदेशासाठी येणारे ७५ ते ८० टक्के व्यक्तींना मानसिक आरोग्य बिघडल्याने काही ना काही शारीरिक आजार असल्याचे दिसून येते. मनोकायिक आजारांवर समुपदेशन अत्यंत आवश्यक ठरते.
- अर्पणा चव्हाण, मानसिक समुपदेशक, पुणे.