World Heritage : छत्रपतींचे शौर्य, जाज्वल राष्ट्रभक्ती विश्वस्तरावर सुवर्ण अधोरेखित
'मराठा साम्राज्यातील लष्करी भू-प्रदेशाखालील छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्याशी संबंधित नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यासह राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी असे बारा किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक अमोल गोटे यांच्याशी दै.'पुढारी'ने साधलेला संवाद.
(मुलाखत व शब्दांकन - निल कुलकर्णी, नाशिक)
जागतिक वारसास्थळाचा दर्जा ही किती मोठी उपलब्धी आहे?
एकाच वेळी छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांना जागातिक वारसास्थळाचा दर्जा मिळणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. शिवप्रेमी, समस्त मराठी जनांसाठी हा आनंद अन् अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवरायांचे हे केवळ किल्ले नसून महाराजांचे शाैर्य, जाज्वल्य राष्ट्रभक्ती, तेजस्वी हिंदुत्ववाद यांची प्रतीके आहेत. हा इतिहास विश्वात सुवर्णअक्षरांनी अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११, तर तामिळनाडूचा एक किल्ला आहे. यातील राज्य पुरातत्त्व विभाग व संरक्षित स्मारक यांचे अख्यत्यारित असलेल्या किल्ल्यांकरिता आम्ही सर्व दस्तऐवज भारतीय पुरातत्त्व विभागाकडे पाठवले. त्यानंतर भारत सरकारने 'युनेस्को'कडे ही सर्व नामांकने पाठवली.
निवड प्रक्रिया, मतप्रक्रिया कशी होते?
'युनेस्को'चा चमू प्रत्यक्ष किल्लेस्थळावर येऊन भेट देऊन गेला होता. या गटाला उत्कृष्ट सादरीकरण करून हे महत्त्व पटवून सांगितले होतेच. त्यानंतर 'युनेस्को'च्या २१ देशांपैकी १४ मते जागतिक वारसास्थळ म्हणून आपल्या किल्ल्यांना मिळणे अत्यावश्यक होते. भारत हाही त्यातील एक सदस्य देश आहे.
मानांकनाचे आणखी काय फायदे होतील?
जागतिक समुदायाकडून यासाठी भलेही निधी मिळणार नसला तरी या समावेशामुळे पर्यटन विकासासह अनेक मोठे फायदे होतील, जागतिक वारसा म्हणून एखादे स्थळ घोषित झाले की, त्याकडे पर्यटक आकर्षित होतातच. याचा फायदा स्थानिकांनाही होणार आहे. किल्ल्याच्या रूपातील जाज्वल्य इतिहास अभ्यासण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतील. स्थानिकांची संस्कृती कला, कौशल्य, उद्योगालाही 'बूस्ट' मिळणार आहे.
मिळालेले 'मानांकन' टिकवण्यासाठी काय आव्हाने असतील?
'वर्ल्ड हेरिसाईट साईट'चा दर्जा मिळाल्यानंतर तो टिकून ठेवण्यासाठी 'साईट मॅनेजमेंट प्लान'चा आराखडा तयार केला आहे. त्याद्वारे संरक्षण, जतनासह व्यवस्थान, परिरक्षण आणि सुनियोजित कार्यान्वयनातून काटेकाेरपणे हे दायित्व कायमस्वरूपी टिकून ठेवावे लागणार आहे. या साईट्सवर होणाऱ्या सर्व घटना, गोष्टी नियमानुसार होत आहेत किंवा कसे, याची अधिक सूक्ष्म आणि अचूक, काटेकाेर पडताळणी करावी लागणार आहे. वाढत जाणाऱ्या पर्यटकांचा येथील निसर्ग, परिसंस्था, पारिस्थितीकीला धोका होऊ न देणे. सम्यक, शाश्वत विकास साधून जागतिक वारसास्थळाचे रक्षण, जतन करणे हे मोठे दायित्व असणार आहे.
केंद्र संरक्षित स्मारकांसारखा निधी आता या स्थळांनाही मिळणार का?
केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यासाठी निधी देऊ शकतात. परंतु या स्थळांचे सुनियोजित व्यवस्थापन करून त्यांचे कार्यान्वयन करणे, या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना न होऊ देणे, त्याचे पावित्र्य, गरिमा जपणे या सर्व गाेष्टी केवळ पुरातत्त्व विभागाचेच नाही तर सुजाण पर्यटकांचेही दायित्व असेल. विकास निश्चित गतीने होईल परंतु त्याहीपेक्षा किल्ल्यांच्या गावातील स्थानिकांचे सण-उत्सव संस्कृती, आदिवासींची परंपरा, नृत्य, खेळ, खाद्यसंस्कृती साल्हेरमुळे यांचेही ब्रॅण्डिंग जागतिक पटलावर करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

