World Engineers Day | शाश्वत विकासाला द्यावे निसर्गस्नेहाचे काेंदण - अभियंत्यांची अपेक्षा
नाशिक : निल कुलकर्णी
आपत्तीपासून ते नवनिर्माणापर्यंत जीवन गतिमान, निरामय करण्यापासून ते विकासापर्यंत सर्वच क्षेत्रांत अभियांत्रिकी अन् अभियंता यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शाश्वत जगाच्या निर्माणासाठी अभियंते हे आधुनिक विश्वकर्मा ठरू शकतील. मात्र, कुठल्याही नवनिर्माणासाठी, विकासासाठी अभियंत्यांनी निसर्गपूरक, पर्यावरणस्नेही, संकल्पनांचे भक्कम अधिष्ठान द्यावे, अशी अपेक्षा अभियंता दिनाचे औचित्यावर अभियंत्यांनी व्यक्त केली.
१५ सप्टेंबर जागतिक अभियंता दिन म्हणून साजरा होताे. 'शाश्वत जगाच्या निर्माणासाठी उपायांची निर्मिती' ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. कृषी, खगोल, आरोग्य, स्थापत्य, बांधणी, मोटार उद्योग, दळणवळण, खाणकर्म, सागरविज्ञान, उपग्रह व अंतराळ विज्ञान, विमान, जहाजबांधणी आदी सर्वच क्षेत्रांत अभियांत्रिकी आणि अभियंत्यांच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहेत. यामुळेच अभियंत्यांना विश्वकर्मा म्हटले जाते. कोविडसारख्या जागतिक महामारीतही मेडिकल इंजिनिअरिंगने कमाल केली. भविष्यात येणारे आपत्ती, आव्हानेही अभियंते पेलणार आहेत. जगाला आकार देण्याचे काम अभियंताच करू शकतात. मात्र, नवनिर्माण आणि विकासाला अभियंत्यांनी पर्यावरणस्नेही, निसर्गपूरकतेचे कोंदण देणे गरजेचे आहे तरच अभियांत्रिकी अन् अभियंते शाश्वत जगनिर्मितीसाठी उपाय देऊ शकतील, अशा प्रतिक्रिया अभियंत्यांनी दिल्या.
अभियंते आधुनिक विश्वकर्माच असतात. कोविडसारख्या महामारीतही मेडिकल अभियांत्रिकी अन् अभियंत्यांनी लसीकरण संशोधनात केलेले 'सोल'प्रमाणे काम असो की, नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी दिलेले योगदान असो आज एकही क्षेत्र असे नाही की, त्यात अभियांत्रिकी नाही. जेव्हा अभियंते पर्यावरणविषयक समस्या सोडवण्यासाठी झपाटून योगदान देतील, तेव्हाच जगाचे विश्वकर्मा हे बिरुद सार्थ ठरेल.
प्रा. सचिन काकडे-पाटील, विद्युत अभियंता, नाशिक.