

आजचा युवा गॅझेटस्, समाज माध्यमाच्या फेऱ्यात अडकला आहे. भौतिकवादाशी नाते जोडलेल्या या घटकाला पर्यावरणाचे भान नाही, अशी सार्वत्रिक ओरड एेकू येते. हे आरोप कृतीमधून खोडून काढत अनेक युवाग्रुप करियर सांभाळून पर्यावरण संवर्धनात नियोजनबद्ध 'प्रयास' करताना दिसत आहे. एकांगी शिलेदारांनी सुरु केलेल्या कार्याला पुढे शेकडोंचे हात जुळले गेले आणि मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या. विश्व वसुंधरा दिनानिमित्त पृथ्वी संवर्धनाचा वसा घेतलेल्या अशाच काही व्रतस्थांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश!
रवि चौधरी आणि सुभाष चव्हाण यांनी २०१० मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे वृक्षसंवर्धनाचा वसा घेत 'प्रयास युथ फाउंडेशन'ची स्थापना केली. मराठवाड्यामध्ये घटलेली वृक्षसंख्या आणि कमी होणारी जैव-विविधता याने अस्वस्थ होण्यापेक्षा आपणच कार्य करावे, असा वसा त्यांनी घेतला. १५ वर्षांतच शहरासह देशभरात ८ लाख वृक्षारोपण करुन वसुंधरेचा हिरवा साज परत मिळून देण्यास त्यांनी हातभार लावला. प्रारंभी केवळ दोन जणांनी सुरु केलेल्या समुहात आज शंभराहून अधिक सदस्य श्रमदान करत आहेत. वृक्षारोपणासह 'पक्षी संवर्धन, ईको-फ्रेंडली सण, देशी बीज संकलन, रोपेवाटिका निर्मिती, निर्माल्य तसेच पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती, कृत्रिम बंधारे-पाणवठे आदी उपक्रम 'प्रयास' राबवते. दर रविवारी ही तरुणाई श्रमदान करते.
नाशिक नागरिक कृती समितीच्या वतीने कर्नल आनंद देशपांडे, ऋषिकेश नागरे आणि अश्विनी भट यांच्यासह पर्यावरणवादी १०० वर्षांहून अधिक जुने वड, पिंपळ, औदुंबर यांसारखे वृक्ष वाचवण्यासाठी जनहित याचिकेव्दारे लढाई देत आहेत. महामार्गावरील वृक्षांसाठी कायद्याची लढाई देत ते वाचवण्याची ह्या मंडळीने सुरु केलेली चळवळ आता व्यापक झाली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर रस्त्याच्या कडेची २०० वर्षे जुनी झाडे कायदा ४१/०६ कायद्यान्वये त्यांनी तोडण्यापासून वाचवली. अनेक झाडांना भट आणि चमुने जीवदान दिले. ग्रुपने २०१० मध्ये १५० हून अधिक जुनी रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या वटवृक्षांचे धुळ्यात प्रत्यारोपण केले. त्र्यंबक रोडवरही त्यांनी ८ हून जुन्या वृक्षांना जीवदान देत प्रत्यारोपित केले.
देवराई, मायावाकी, घनवन, वनशेती यासह पारंपरिक पद्धतीने वृक्षसंवर्धन करण्यासह जैवविविधता वाढवण्यासाठी उपक्रम तयार आहेत. अनेक मोठ्या उद्योगसमूहांचे त्यापोटी सहकार्य लाभत आहे. २०३५ पर्यंत दुष्काळग्रस्त मराठवाडयात १ कोटी वृक्षसंवर्धनाचे उद्दीष्ट ठेऊन काम पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे.
रवि चाैधरी, संस्थापक अध्यक्ष, प्रयास युथ फाउंडेशन, छत्रपती संभाजी नगर.
रस्त्यामध्ये अडथळा येणाऱ्या वृक्षांमुुळे अपघात होतात, असे विधान करणे चुकीचे वाटते. मद्यपान करुन, बेदकारपणे आणि वेगनियंत्रण न करता येणाऱ्या स्पीडने गाडी चालवल्यानेच बहुतांश अपघात झाल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळाली आहे. केवळ वृक्ष मनु्ष्याचे अपघातास कारणीभूत ठरत नसतात. वाहनांची गती चालकाच्या हाती असते. त्यामुळे वृक्ष तोडताना जबाबदारीचे भान राखावे.
अश्विनी भट, पर्यावरणवादी, नाशिक.
अभिजीत महाले हे २००४ पासून वन्यजीव, पक्षी प्राणी वाचवण्यासाठी योगदान देत आहेत. प्रारंभी इको एको फाउंडेशन आणि नंतर वनविभाग संलग्न रेस्क्यू नाशिक डिव्हीजन सोबत त्यांनी शेकडो पशु-पक्ष्यांना जीवदान दिले. जखमी अवस्थेत पशु-पक्ष्यांची सुटका आणि उपचार करण्यात ते पुढाकार घेतात. वनविभाग आणि रेस्क्यू चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव उपचार केंद्रात उपचार केले जातात.