Nashik | वर्ल्ड कपचा जल्लोष अन् दोन गटांत तुफान राडा

आनंदोत्सवाला गालबोट, गोळीबार अन् कोयत्याने वार : पाच जण जखमी
Nashik | वर्ल्ड कपचा जल्लोष अन् दोन गटांत तुफान राडा
Published on
Updated on

नाशिक : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्ड कप जिंकताच नाशिकमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. रात्री १२ नंतर नाशिककरांनी रस्त्यावर उतरत फटाक्यांची आतषबाजी केली. काही ठिकाणी ढोल- ताशांवर ठेका धरण्यात आला. मात्र, या आनंदोत्सवाला गालबोट लागल्याची घटना नाशिक रोड, विहितगाव येथील मथुरा चौकात घडली. वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा केला जात असतानाच, दोन गटांत तुफान राडा झाला. एकमेकांवर बंदुका रोखत गोळीबार करण्यात आला. तसेच कोयत्याने वारही केले गेल्याने नाशिक रोड परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यात पाच जण जखमी झाले, तर एकाच्या मांडीला गोळी लागली आहे.

Summary
  • वर्ल्ड कप जिंकताच नाशिकमध्ये जोरदार जल्लोष मात्र या आनंदोत्सवाला गालबोट

  • वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा केला जात असतानाच, दोन गटांत तुफान राडा झाला.

  • या राड्यात देवळाली गाव आणि विहितगाव येथील पाच जण जखमी झाले.

  • नाशिक रोड परिसरात टवाळखोरांकडून कोयता आणि बंदुकीचा सर्रास वापर केला जात असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

टी-२० वर्ल्ड कपचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नाशिक रोड परिसरात मध्यरात्री मोठ्या प्रमाणात तरुण एकत्र आले होते. आनंदोत्सव साजरा करीत असतानाच दोन गट आमने-सामने आले. सुरुवातीला बाचाबाची, शिवीगाळ केली गेली. मात्र, काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्यामुळे एकच पळापळ झाली. या राड्यात बंदूक आणि कोयत्याचा सर्रास वापर केला गेला. या घटनेदरम्यान, देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार याच्या मांडीला गोळी लागली. या राड्यात देवळाली गाव आणि विहितगाव येथील पाच जण जखमी झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. विहितगावचे जमधडे, हांडोरे यांच्या गटांत राडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राड्यात जखमी झालेल्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक रोड परिसरात टवाळखोरांकडून कोयता आणि बंदुकीचा सर्रास वापर केला जात असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

२४ तासांत दुसरी मोठी घटना

नाशिक रोड परिसरात अवघ्या २४ तासांत दुसरी मोठी घटना उघडकीस आली. शुक्रवारी (दि. २८) वेटरला काम करण्यास सांगितले असता, त्याने साथीदारांच्या मदतीने दिवसाढवळ्या हॉटेल मालकावर कोयत्याने व इतर हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत नाशिक रोड येथील मुक्तिधाममागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सचदेव गंभीर जखमी झाले. देवळाली गाव, राजवाडा येथील डॅनिअल उर्फ डॅनी थोरात या वेटरला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा नाशिक रोड भागात दोन गटांत राडा झाल्याची घटना उघडकीस आली.

नाशिक रोडला कोयता गँग?

दोन्ही घटनांमध्ये कोयत्याचा वापर केला गेल्याने नाशिक रोड परिसरात कोयता गँग सक्रिय असल्याची चर्चा रंगत आहे. दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले केले जात असल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करून कोयताधारी संशयितांना अद्दल घडवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आर्थिक वादातून हाणामारी

दीड वर्षापूर्वी हातउसनवार घेतलेल्या पैशाच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर येत आहे. मित्र स्वप्निल हांडोरे याने गणेश जमधडे याच्याकडून दीड लाख रुपये हातउसनवार घेतले होते. जमधडे याने स्वप्निलकडे पैशांसाठी तगादा लावला होता, मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचा राग अनावर झाला. शनिवारी मध्यरात्री हांडोरे, त्याचा भाऊ दर्शन व विकी हांडोरे मथुरा चौकात बसले होते. त्याचा सुगावा जमधडे यास लागला. त्यानंतर त्याने मित्र प्रतिक वाकचौरे, आकाश पवार, सौरभ लोंढे यांना सोबत घेत हांडोरे बधुंवर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल हांडोरे बंधुनीही हल्ला केला. यात आकाश पवारच्या मांडीला, स्वप्निलच्या पायाला बंदुकीची गोळी चाटून गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news