

नाशिक : निल कुलकर्णी
व्यग्र जीवनशैली, दोन्ही पालकांची वाढलेली व्यवधाने यामुळे दोन्ही पालक मुलांशी खेळ- संवादासाठी वेळ देऊ शकत नाहीत. लहान झालेली कुटुंबे, हरवलेला पालक- पाल्य संवाद यामुळे मुले माेबाइलच्या सत्याभासी दुनियेत 'आधार' शोधतात. दिवसातील ३ ते ४ तास सलग मोबाइल पाहण्याच्या सवयीमुळे मुले 'व्हर्च्यूअल ऑटिझम'चे शिकार होत आहेत, असे धक्कादायक निष्कर्ष स्वमग्नता आजाराचे अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सत्याभासी माध्यमांमुळे मुले आत्मकेंद्री, स्वमग्न मानसिकतेने ग्रस्त
'न्यूरोे विविधतेचा विकास अन् श्वाश्वत विकास उद्दिष्टे' ही यंदाची संकल्पना
२ एप्रिल हा दिवस जागतिक स्वमग्नता जागृती दिवस म्हणून साजरा होतो. नैसर्गिक किंवा जन्मत: स्वमग्न मुलांचा हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. काही मुले स्वमग्न तसेच हायपर ॲक्टिव्ह अशी दोन्हीही असतात. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर' ही नैसर्गिक स्वमग्नता असून त्यामागे विविध कारणे आहेत. मात्र 'व्हर्च्यूअल ऑटिझम' हा मानवनिर्मित असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत. कोविड काळात मुलांचा अभ्यास मोबाइलद्वारे अधिक होता. खेळ, शाळा बंद झाल्यामुळे मुले बहुतांश वेळ मोबाइलवर घालवत त्यामुळे मुलांच्या हालचाली मंदावल्या आणि त्याच्या अतिरेकानंतर अनेकांना 'व्हर्च्यूअल ऑटिझम' या आजाराने ग्रासले, असा अभ्यास तज्ज्ञांनी प्रकाशित केल्याची माहिती स्वमग्न मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या शिक्षिका स्पेशल (चाइल्ड) एज्युकेटर आदिती मोराणकर यांनी दिली. त्यामुळे स्वमग्नता ही नैसर्गिक नसून, ती मानवी चुकांमुळेही होऊ शकते ही धोक्याची घंटा समजून पालकांनी सावध राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
सामान्य मुलांचे बोलणे अचानक बंद होणे.
जे मूल खेळत- बागडत आनंदी असते, ते एकाच ठिकाणी बसून शांत होणे
समवयस्क मुलांमध्ये मिसळण्याचे टाळणे
मोबाइल हातातून काढताच हायपर होऊन किंचाळणे, रडणे, मारणे
मोबाइल पाहात असताना तो काढून घेतल्यास वस्तू फेकणे, डोके आपटून घेणे
पालकांनी आधी स्वत:ला मोबाइल व्यसनापासून दूर ठेवावे.
मुले अनुकरणशील असतात. ते पालकांचेच अनुकरण करतात
मुलांशी पुरेसा संवाद साधा. त्यांना अभिव्यक्त होण्यास अवकाश, वाव द्यावा
पालकांनी मुलांसमवेत खेळणे, मैदानात, बागेत नेणे, शारीरिक श्रम होतील असे खेळ.
निसर्गाच्या सानिध्यात बागडू देणे, पाणी, मातीशी खेळणे. झाडावर चढणे आदी उपक्रम
मुलांच्या कलांना वाव द्यावा, चित्र रंगवण्यासाठी चित्रपुस्तके, गोष्टींची पुस्तके आणून द्यावीत
मुलांचे मोबाइल व्यसन हळूहळू कमी करणे. बालनाटय चळवळीला गती द्यावी.
चित्रे पाहून मुलांना गोष्टी, शिल्प, कला निर्मिती शिकवावी.
महत्त्वाचे म्हणजे पालकांनी स्वत:चे मोबाइलचे व्यसन पूर्णपणे कमी करणे.
न्यूक्लिअर कुटुंबे, व्यग्र पालक, यामुळे मुलांना मोबाइलचे व्यसन जडते. त्यातून 'व्हर्च्यूअल ऑटिझम' ही मानवनिर्मित स्वमग्नता मुलांमध्ये वाढत आहे. 'कोविड'नंतर अशा मुलांची संख्या वाढली असून, त्यांना पुन्हा नॉर्मल करणे मोठे आव्हान असते. त्यामुळे पालकांनी स्वत: मोबाइल व्यसनापासून दूर राहून मुलांशी संवाद वाढवावा.
डॉ. आदिती मोराणकर, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर, नाशिक.