

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दशकात एचआयव्ही संक्रमणित रुग्णांची संख्या 50 ते 60 टक्क्यांनी घटली आहे. सुरक्षित संबंधाचे वाढलेले प्रमाण, निरोध खरेदीकरण्यासाठीचा गळून पडलेला संकोच, सरकारी पातळीवरुन रोगाच्या निमुर्लनासाठी करण्यात आलेले उत्कृष्ट कार्य आणि माध्यमातून झालेली जनजागृती यामुळे नवीन संक्रमण झालेल्या रुग्णांचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे चित्र आनंददायी असले तरी रुग्ण 'एआरटी' औषधोपचार घेण्यात कुचराई करत असल्याचे चित्र गंभीर आहे.
1 डिसेंबर हा जागतिक एडस् प्रतिबंध दिवस म्हणून साजरा होतो. 80 आणि 90 व्या च्या दशकात एचआयव्ही बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर या रोगाविषयी सरकारी स्तरावरुन राबवलेली व्यापक मोहीम, माध्यमांमधून विशेषत: त्यावेळी जनसंवादाचे प्रभावी आणि घरोघरी पोहोच असलेले 'आकाशवाणी' व दूरचित्रवाणी माध्यमांतून झालेली जागृती याचे सकारात्मक दृश्य परिणाम गेल्या दोन दशकात पाहावयास मिळाले. नाशिकमध्येही गेल्या दोन दशकात नवीन संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या प्रचंड कमी झाली. जिल्ह्यात 15 ते 20 वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 150 ते 200 इतकी असे. आज महिन्यातून 40 ते 50 इतके नवीन रुग्ण येतात अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर (एआरटीसी) डॉ. सुनील ठाकूर यांनी दिली.
मात्र रुग्ण सीडी-4 काउंट वाढला ही आणि अन्य कारणे सांगून नियमित ॲण्टी रेक्ट्रोव्हायरल थेरपीची औषधे घेण्यात कुचराई करत असल्याचे चित्र चितांजनक असल्याचेही डॉ. ठाकुर यांनी नमूद केले. झाल्यास रुग्णांमध्ये इतर रोगांचा हल्ला चढवून त्याची परिणीती गंभीर होण्याची शक्यता असते, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात आज 19 हजार रुग्ण असून त्यातील 18 हजार 800 हून अधिक रुग्ण 'एआरटी'चा लाभ घेत आहेत. रुग्णांना त्याच्या गावी, घराजवळच उपचार मिळावेत म्हणून लिंक सेंटरची उभारणीही करण्यात आली असून पूर्वी 6 लिंक सेंटरची संख्या आज 11 इतकी वाढली आहे.
जिल्ह्यात एचआयव्ही बाधित नवीन रुग्णांचे प्रमाण गेल्या 20 वर्षांत 60 टक्क्यांनी घटले. परंतु जिल्हा रुग्णालयात जे रुग्ण सध्या 'एआरटी' उपचार घेत आहेत, त्यामधील बहुतांश अनियिमितपणे औषधी घेतात किंवा त्यांनी औषधी घेणे बंद केल्याचे आमचे निरीक्षण आहे. पर्यायी थेरपी घेण्यासाठी 'एआरटीचे' औषधी घेण्यात कुचराई, टाळाटाळ करणे, त्यांच्यासाठी अत्यंत घातक ठरणारे असून त्यामुळे इतर रोगांच्या संक्रमणाला ते बळी पडू शकतात.
डॉ. सुनील ठाकूर, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआटीसी सेंटर