

मनमाड : रईस शेख
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी आनंदाची बातमी.. प्रवासा दरम्यान रोकड संपल्यास आता चिंता करण्याची गरज नाही. कारण रेल्वे प्रशासनाने धावत्या रेल्वेत एटीएमची व्यवस्था करण्याचा केवळ निर्णयचं घेतला नाही तर लवकरच त्याची सुरुवात मनमाड-मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसपासून केली जाणार आहे.
मनमाड शहरात असलेल्या रेल्वे वर्क शॉपमध्ये पंचवटी एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत डब्यात एटीएम बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रवाशांना एक्स्प्रेसमध्ये एटीएम सुविधा मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. भारतात हा पहिला प्रयोग असून त्यानंतर टप्प्या टप्प्याने इतर रेल्वेतही प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रवासा दरम्यान मोजके पैसे घेऊन बाहेर पडणाऱ्या माणसाला अनेकदा अतिरिक्त रोकडची गरज भासते. अशावेळी त्याला ट्रेनमधून उतरून प्लॅटफॉर्मवर किंवा स्टेशनबाहेरील एटीएममधून पैसे काढावे लागतात. काही वेळा या प्रक्रियेमुळे गाडीही चुकते. प्रवाशांची ही गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने धावत्या गाडीत एटीएम बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी मनमाड शहरातील वर्कशॉपमध्ये पंचवटी एक्स्प्रेसच्या वातानुकुलित डब्यात एटीएम मशीन बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना एटीएमची सुविधा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत होत असून, प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रवाशांना सर्व सोयी सुविधा मिळाव्या यासाठी रेल्वे प्रशासना तर्फे वेळोवेळी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात सध्या अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील अनेक रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी धावत्या गाडीत एटीएम बसविण्याचा निर्णय घेतला आहे.