

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील गिरणारे येथील महिलेस मारहाण प्रकरणातील महिला आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षे दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दंडाची शिक्षाही ठोठावली. याबाबत नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश एन. गुरुमारे यांनी ३० ऑक्टोबरला या खटल्याचा निकाल दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ फेब्रुवारी २०१४ रोजी दुपारी गिरणारे गावातील सुतार गल्लीत घडली होती. रंजना गायकर यांच्याबाबत हा प्रकार घडला. आरोपी सीताबाई गायकर आणि संबंधित कुटुंबांत वडिलांपार्जित मिलकतीच्या वाटणीवरून न्यायालयात वाद सुरू होता. या वादातून कुरापत काढून रंजना गायकर यांना विजेच्या खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. त्यांचा गळा पट्ट्याने आवळत जीवे मारण्याचाही प्रयत्न झाल्याची तक्रार होती.
याप्रकरणी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गंगे यांनी तपास करत आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली.
या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर अधीक्षक विमला एम. यांनी तपासी अधिकारी, पैरवी अंमलदार आणि दोषसिद्धी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.