Wine Shop Operator ... तर थेट वाईन शॉप चालकांवरच होणार कारवाई
सिडको (नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून सिडको सह परिसरात असलेल्या वॉईन शॉप लगतच बरेच जण मद्य प्राशन करीत असतात. त्यामुळे तेथेच वाद होतात अन गुन्हेगारीही वाढते. यासाठी अंबड पोलिसांनी वॉईन शॉप चालकांना नोटीस बजावत सज्जड दमच भरला आहे. दुकानालगत दारू पिणारे दिसले, तर त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर म्हणजे त्रिमूर्ती चौक, सिडको हॉस्पिटल जवळ, पाथर्डी रोड, लेखा नगर, महालक्ष्मी नगर तसेच अंबड औद्योगिक वसाहत याठिकाणी वॉईन शॉप आहेत. या वॉईन शॉप लगतच स्नॅक्स विकणारे असतात. बरीच वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. एवढेच नव्हे तर दुकानातून बाटली घ्यायची अन तेथेच जवळपास रिचवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यास वॉईन शॉप चालकांनाच जबाबदार धरून आता त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
वॉईन शॉपसमोरच मद्यसेवनामुळे गुन्हेगारी वाढत आहे. हे थांबले नाही तर वॉईन शॉप चालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
जग्वेंद्रसिंग राजपुत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड
सध्या पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे पाथर्डी रोडवर असलेल्या चायनिज व अंडाभूर्जी विक्रेत्यांच्या गाड्या बंद दिसत आहे. मात्र काही दिवसांनी परत तीच स्थिती निर्माण होते. यासाठी ही मोहीम वारंवार राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाथर्डी फाटा ते अंबड रस्त्यावर कायमच वाहतुकीची कोंडी होते. या कारवाईमुळे मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

