

नाशिक : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळत ॲड. माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डाॅ. राहुल आहेर यांना भर प्रचारसभेत मंत्रिपदाचा शब्द देऊनही तो फिरविल्याने चांदवड-देवळ्यात नाराजीचा सूर उमटला आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिंडोरीत झालेल्या सभेत शरद पवार यांनी झिरवाळ यांच्यावर अविश्वास दाखवत ते लायक नसल्याची टीका केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनी झिरवाळ यांचा लोकसंपर्क व कार्यक्षमता बघून त्यांना मंत्री करण्याचे दिंडोरीकरांना आश्वासन दिले होते. तर, सिन्नर येथील प्रचारसभेत पवार यांचे भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने थेट उभे राहून कोकाटेंना मंत्री करा, अशी मागणी केली होती. यावर कोकाटेंना निवडून द्या मंत्री करतो, असा शब्दच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. मंत्रिमंडळात कोकाटेंना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे आश्वासनही सिन्नरकरांना दिले होते. रविवारी (दि. १५) झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधीत दादांनी दिलेला शब्द पूर्ण करत, झिरवाळ व कोकाटे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली. याउलट मुख्यमंत्री फडणवीस यांनी देवळा येथे झालेल्या सभेत डाॅ. आहेर यांना २० हजारांचे मतधिक्य दिल्यास राज्यमंत्रिपद, तर वीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिल्यास कॅबिनेट मंत्री करणार असल्याचे आश्वासन दिले होते. २०१९ मध्येही दिलेले आश्वासन न पाळल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, चांदवडकरांना डाॅ. आहेरांना मोठे मतधिक्य देत त्यांना विधानसभेत पाठविले. यामुळे मंत्रिमंडळात डाॅ. आहेर यांची वर्णी लागणार हे निश्चित मानले जात होते. परंतु मंत्रिमंडळाच्या शपधविधीत डाॅ. आहेर यांचे नाव न आल्याने चांदवडकरांमध्ये दुसऱ्यांदा नाराजी पसरली आहे. याशिवाय नाशिक शहराने भाजपला तीन आमदार देऊनही यापेकी एकालाही संधी न मिळाल्याने नाशिककरांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.
दरम्यान, लाडक्या बहीण योजनेने महायुतीला घवघवीत यश मिळून दिलेले असताना नाशिक शहरातील नाशिक मध्य व पश्चिममधून निवडून आलेल्या प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनाही मंत्रिपद मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मतदानाच्या निकालापासून शपधविधीपर्यंत या दोघींना फडणवीस न्याय देतीला या प्रतीक्षेत नाशिककर होते. मात्र, या दोघींना संधी न मिळाल्याने त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.