

नाशिक : धनराज माळी
तुळशी विवाहनंतर विवाह जुळविण्यासाठी वधू व वर शोध मोहिमेला पालकांकडून वेग आला आहे. दोन्ही पक्षांकडून नाते - गोते, मित्रांमार्फत विवाह जुळविण्यासाठी चांगली स्थळे सुचविण्याचा जबाबदाऱ्या सोपविताना पालक मंडळी दिसत आहे. त्यात काहींचे विवाह जुळले, तर काहींनी लग्नाचा बार उडविण्यासाठी शुभ मुहूर्ताची तारीखही निश्चित केली आहे. म्हणजेच विवाहाबाबतची गडबड सुरू असली, तरी नवीन वर्षातील जानेवारी, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मात्र विवाहासाठी एकही शुभ मुहूर्त नसल्याचे पुरोहितांकडून सांगण्यात येत आहे. ते वगळता इतर महिन्यांमध्ये मुहूर्तांची रेलचेल आहे.
लग्न सोहळा म्हटला म्हणजे धुमधडाका आलाच. त्याशिवाय लग्नाची शोभाच नसते. असे आजची तरुणाईला वाटते. त्यामुळे पालकांनाही आपली कन्या असो की, पुत्र त्यांचा विवाह जोरदार झाला पाहिजे, अशी अपेक्षा असते. नातेवाईक, आप्तेष्ट मित्र यांची हजेरीशिवाय लग्नाची शोभाच नाही. त्यामुळे लग्न ठरविण्यापासून तर विवाह मुहूर्ताची तारीखपर्यंत सर्वांची सवड, नोकर वर्गाला सुटी, घरातील मुलांची शाळा-महाविद्यालये, परीक्षेचा काळ आदी बाबींचा विचार करूनच मुहुर्त काढले जातात. यंदाचा लग्नसराईचा धूमधडाका नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे.
दिवाळीनंतर तुळशी विवाहानंतर विवाहेच्छुक वर-वधूंसाठी योग्य स्थळे शोधण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. मात्र दोन दिवसांवर आलेल्या नवीन वर्ष २०२६ प्रारंभ होत आहे. नवीन वर्षाचा सुरुवातीलाच मात्र विवाहसाठी एकही मुहूर्त नाही. कारण पौष महिना म्हटला की, शुभकार्य वर्ज्य मानले जाते. काही महिन्यांमध्ये खरमास आणि होलाष्टकमुळेही विवाह मुहूर्त कमी असतात. तसेच ऑक्टोबर २०२६ मध्येही विवाह मुहूर्त नसल्याचे पंचाग सांगते. असे असले, तरी अंतिम निर्णयासाठी ज्योतिषांचा सल्ला घेणे योग्य राहील. मात्र नवीन वर्षातील जानेवारी व ऑक्टोबर हे दोन महिने वगळता इतर महिन्यांमध्ये लग्न मुहूर्त मोठ्या प्रमाणात असल्याचे जोतिषांचे म्हणणे आहे.
२०२६ मधील लग्नाचे शुभ मुहूर्त तारखा महिनानिहाय याप्रमाणे:
फेब्रुवारी : ५,६,८,१०,१२,१४,१९,२०,२१,२४,२५,२६
मार्च : १,२,३,४,७,८,९,११,१२
एप्रिल :१५,२०,२१,२५,२६,२७,२८,२९
मे : १, ३, ५, ६, ७, ८,१३, १४
जून : २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २९
जुलै : १, ६, ७, ११
नोव्हेंबर : २१, २४, २५, २६
डिसेंबर : २, ३, ४, ५, ६, ११, १२