

नाशिक : राजस्थानच्या पूर्व भागात निर्माण झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे नाशिक जिल्ह्यात येत्या चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने झंझावाती वारे वाहू शकतात.
बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील तापमानवाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतही काहीशी अशीच स्थिती राहणार असून, जळगावमध्ये तीन, तर नंदुरबार आणि धुळ्यात दोन दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाचे राज्यात आगमन झाले असून, विशेषत: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेला आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. आता अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने, कृषी क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी काढणीला आलेला गहू पावसाच्या तडाख्यात सापडला होता. सद्यस्थितीत जिल्ह्यात गव्हासह कांदा, टोमॅटो, भाजीपाला, द्राक्षे, आंबा, डाळींब आदी पिके उभी असून, अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांकडून पुरेशा उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे.