

नाशिक : विलंबाने परतलेल्या पावसानंतर वातावरणात कमालीचा फरक पडला असून, सकाळी थंडीचा गारठा अन् दुपारी उन्हाच्या झळा असा अनुभव शहरासह ग्रामीण भागातील जनता घेत आहे. या संमिश्र वातावरणामुळे नागरी आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
खऱ्या अर्थाने पावसाळा उलटून आताशा हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र, नोव्हेंबरमध्येही ऑक्टोबरचा हीटचा तडाखा अद्याप कायम आहे. सकाळ - सायंकाळ गारवा अन दुपारच्या सत्रात उन्हाच्या झळा असे सध्याचे संमिश्र वातावरण आहे. ते अनारोग्याला कारणीभूत ठरत आहे. शहरासह ग्रामीणवासीय सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीने त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस संसर्गीय आजारांच्या रुग्णात भर पडत असून, दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे.
गर्दीच्या ठिकाणी संसर्गीय आजारांचा फैलाव होण्याचा धोका अधिक असतो. सध्या दिवाळीनिमित्त माहेरवाशिणी मुलाबाळांसह माहेरी गेलेल्या आहेत. त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याने बसस्थानके गर्दीने ओसंडून वाहत आहेत. या परिस्थितीत कडक ऊन, धुळीची समस्या अन् खराब वातावरण यामुळे माहेरवाशिणींसह लहान मुलेही आजारी पडली आहेत.
शासकीय कार्यालये, खासगी संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारीही आजारी पडले असल्याचे दिसून येत आहे. काही कर्मचारी डॉक्टरी इलाजासाठी 'एसएमएस' टाकून दोन दिवसांच्या रजेवर आहेत, तर काही जण दुपारच्या सत्रात अर्ध्या दिवसाची रजा घेऊन आरामाला पसंती देत आहेत. एकूणच माहेरवाशिणींसह लहान मुले, कर्मचारी सर्दी, खोकला, ताप अंगदुखी या संसर्गीय आजारामुळे त्रस्त असून, दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे.
संसर्गीय आजारापासून बचाव करण्यासाठी कोरोना काळात वापरण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सतत हात धुवा, नाका, तोंडावर मास्क वापरा, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा, इतरांना आपल्यापासून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.