

नाशिक : शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व गावांमधील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांची अणुजैविक तपासणी वर्षातून दोन वेळा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यात मान्सूनपश्चात पाणी तपासणी मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
या मोहिमेत सर्व ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांचे पाणी नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येणार आहेत. नाशिक, दिंडोरी, सिन्नर व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील पाणी नमुने जिल्हा प्रयोगशाळा, गडकरी चौक, नाशिक येथे, तर इतर तालुक्यांचे नमुने संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीचा पाणी नमुना गोळा करण्यासाठी ग्रामसेवक, आरोग्यसेवक व जलसुरक्षक यांनी समन्वय साधून निर्धारित तारखांना नमुने प्रयोगशाळेत पोहोचवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेतून दिलेल्या वेळापत्रकानुसार नमुने घेऊन केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातून १०० टक्के नमुने निश्चित वेळेत प्रयोगशाळेत पोहोचतील, याची जबाबदारी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्याधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहायक, तर ग्रामस्तरावर ग्रामसेवक, आरोग्यसेवक व जलसुरक्षक यांची जबाबदारीदेखील निश्चित करण्यात आली आहे. तसेच जलजन्य साथरोग टाळण्यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यकतेनुसार दरमहा जैविक व टीसीएल तपासणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.