

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिककरांना तूर्त १० टक्के पाणी कपात लागू होणार नसल्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले असले, तरी शहरावरील पाणीकपातीचे संकट अद्याप टळलेले नाही. राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन जलसंपदा विभागाने १० टक्के कपातीच्या सूचना दिल्यामुळे कपातीची टांगती तलवार कायम आहे. विशेष म्हणजे, संभाव्य पाणीटंचाई काळात टँकरच्या संख्येत वाढ करण्यासही महापालिकेने नकार दिला आहे. टँकरद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा केल्यास कपातीचा मूळ उद्देशच निष्फळ ठरेल, अशी भूमिका प्रशासनाकडून घेतली जात आहे.
पाणीकपात सुरू झाल्यास तिचा उद्देश सफल होण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात गटनेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
सन २०२५-२६ मध्ये नाशिक शहरासाठी ६ हजार ४०० दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ६ हजार ६१ दलघफू पाण्याचा वापर झाला. त्यामध्ये गंगापूर धरण समूहातून ४ हजार ३२३.७४ दलघफू, दारणा धरणातून २५६.५२ दलघफू, तर मुकणे धरणातून १ हजार ४८०.७७ दलघफू पाणी वापरण्यात आले. वाढती लोकसंख्या आणि २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता, महापालिकेने यंदा नियमित वापरासाठी ७ हजार ६४५ दलघफू पाण्याची मागणी केली आहे.
त्यात गंगापूर धरण समूहातून ५ हजार ७१५, दारणा धरणातून २३० आणि मुकणे धरणातून १ हजार ७०० दलघफू पाण्याचा समावेश आहे. याशिवाय सिंहस्थाच्या जुलै-ऑगस्ट २०२७ या कालावधीत साधुग्राम आणि भाविकांसाठी ६३५ दलघफू अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासाठी एकूण ८ हजार २८० दलघफू पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने सादर केला आहे.
मात्र, मनपाच्या मागणीनुसार पाणी आरक्षण मिळालेले नाही. त्यातच यंदा अपुरा पाऊस झाल्याने जलाशयांमधील उपलब्ध साठ्याचा विचार करून जलसंपदा विभागाने आतापासूनच १० टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपाने दिवाळीनंतर कपातीचा निर्णय घेण्याची तयारी केली होती. मात्र, धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा, शहरातील वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता कपात करू नये, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला होता. पालकमंत्र्यांनी तूर्त कपात नसल्याचे स्पष्ट केले.
विभागनिहाय एकच टँकर
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विभागनिहाय प्रत्येकी एक टँकर उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी पाणी कपात लागू झाल्यास, टँकरची संख्या वाढविण्याच्या सूचना स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, पाण्याची बचत व्हावी आणि कपातीचा उद्देश साध्य व्हावा, यासाठी यंदा टँकरची संख्या वाढवू नये, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे पाणी कपात लागू झाल्यास नागरिकांना टँकरच्या माध्यमातूनही अतिरिक्त दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.