मनमाड : यंदा जिल्ह्यावर वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने दुष्काळ हटला असून, परतीच्या पावसाने मनमाडकरांना दिलासा दिला आहे. वागदर्डी धरण काठोकाठ भरून सांडव्यावरून पाणी गेल्याने शहराला गुरुवार (दि. २४) पासून १० दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली. साधारण एक वर्षापासून मनमाडकरांना महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत होता. त्यात कपात होऊन १० दिवसांत पाणी मिळणार असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर ही आनंदवार्ता ठरली आहे.
मनमाडला कायम पाणीटंचाई असते. गतवर्षी तर जिल्ह्यानेच दुष्काळाचे चटके सोसले. यंदा मात्र समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे जिल्हावासीय चिंब झाले. परंतु, त्यास मनमाड अपवाद राहिले. भर पावसाळ्यात शहर परिसरात दोन-तीन वेळाच जोरदार पाऊस झाला. वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यात धरणाअगोदर पांझण नदीवर तब्बल २२ ते २५ छोटे-मोठे बंधारे बांधण्यात आले आहेत. हे बंधारे भरल्याशिवाय पाणी पुढे प्रवाही होत नाही. गतवर्षीच्या दुष्काळामुळे तृषार्त जमिनीची तहान भागण्यास यंदा अधिक कालावधी लागला. बंधारे भरण्याची मालिका संथगतीने चालली. परिणामी, वर्षापेक्षा अधिक कालावधी, तोही पावसाळा उलटेपर्यंत मनमाड पालिकेला पालखेड धरणातून मिळणाऱ्या आवर्तनच्या माध्यमातून महिन्यातून एकदा पाणीपुरवठ्याची कसरत करावी लागली.
यंदा पावसाने चांगली सलामी दिली, मात्र त्यानंतर फक्त रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले - ओढ्यांना पाण्याची प्रतीक्षाच राहिली. परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. काही दिवसांपासून सलग जोरदार पाऊस होत असल्याने वागदर्डी धरण भरून वाहू लागले. दोन वर्षांनंतर धरण ओव्हरफ्लो झाल्याने मनमाडकरांनी समाधान व्यक्त केले. तेव्हापासून किमान आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर जनभावना आणि धरणात उपलब्ध जलसाठा याचा विचार करून प्रशासनाने पाणीपुरवठा १० दिवसांवर आणण्याचा निर्णय घेतला.