

जानोरी : यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही मार्च महिन्याच्या सुरुवातीस दिंडोरी तालुक्यातील धरणांतील उपयुक्त जलसाठा केवळ 50 टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबर अखेरीस तुडुंब भरलेले प्रकल्प मार्चमध्ये निम्मेच राहिले आहेत.
दिंडोरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, दरवर्षी स्थानिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सद्यस्थितीत असलेला उपलब्ध जलसाठा संरक्षित केल्यास मे अखेरीस पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाही. परंतु, वेगाने होणाऱ्या उपशामुळे एप्रिलपासूनच प्रकल्पालगतच्या गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
वातावरणातील बदलांमुळे यंदा पाच महिने पावसाळा सुरू होता. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र, डिसेंबर व जानेवारी महिन्यांत जलसाठा झपाट्याने कमी झाला. सध्या पुणेगाव धरणात ४७, वाघाड धरणात ४२, तर पालखेड धरणात केवळ ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अवघ्या तीन महिन्यांत प्रकल्पातील पाणी निम्म्यावर आले आहे. त्यामुळे उर्वरित चार महिने हा साठा जपून वापरण्याची गरज आहे. उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर न केल्यास आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने प्रकल्पातील उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे. जर पाण्याची चोरी झाली, तर एप्रिल महिन्यापासूनच प्रकल्पालगतच्या गावांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसू शकतो. सध्या काही भागांतील विहिरी तसेच कूपनलिकांचे पाणी आटू लागले आहे. यापूर्वी कधीच फेब्रुवारीत तळ न दिसलेल्या विहिरींनी तळ गाठला आहे. एप्रिल-मे महिन्यांत कोरडे पडणारे बोअरवेल आता फेब्रुवारी-मार्चमध्येच कोरडे पडत आहेत. याचे एक कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे भूजल पातळी वाढण्याऐवजी पाणी वाहून गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दुष्काळाच्या काळातही परिसरातील विहिरींनी एप्रिलपर्यंत तळ गाठला नव्हता. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानेही फेब्रुवारी-मार्चमध्येच विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची योग्य साठवणूक न होणे. यामुळे प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना आखणे आवश्यक आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि जलसंधारणावर भर द्यावा. अन्यथा येत्या महिन्यांत पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.
पाण्याचे नियोजन करताना स्थानिक लोकप्रतिनिधींंना विश्वासात घेऊन करावे. तालुक्यात धरणे असूनही पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. दरवर्षी संघर्ष करावा लागतो. यावर्षी विचारात घेऊन पाणी सोडावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
पांडुरंग गणोरे, तालुकाप्रमुख, शिवसेना (उबाठा गट) दिंडोरी, नाशिक.
पालखेड धरणातील पाण्याचे व्यवस्थापन वरिष्ठ पातळीवरून होते. करंजवण व वाघाड धरणावर पालखेड अवलंबून आहे. उन्हाळ्याचे व्यवस्थापन केले आहे. नागरिकांनी उन्हाची दाहकता लक्षात घेता पाणी जपून वापरावे.
भूषण सोनवणे, शाखा अभियंता, पालखेड धरण, नाशिक.