

नाशिक : जिल्ह्यातील धरणसाठे हे पावसाळ्यात चांगल्या झालेल्या पावसामुळे समाधानकारक स्थितीत आहेत. मार्चअखेर ४५ टक्क्यांहून अधिक उपयुक्त जलसाठा असल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरीला टंचाईची समस्या चुकलेली नाही. विशेषतः ६ पाड्यांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे दाखल झालेल्या पाणी मागणी प्रस्तावांना प्रशासनाने मंजुरी दिली असून, पहिला टँकर लवकरच सुरू होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी पर्जन्यमान घटल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन पावसाळ्यातही सुमारे ३९९ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू होता. गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी झाली. धरणे ओसंडून नद्या, नाले खळाळले. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत टॅंकरची मागणी कमी राहण्याची आश्वासक स्थिती झाली. त्याबाबतचा टंचाई आढावा घेताना यंदा २०० टँकरचे नियोजन होऊन, त्यासाठोटींच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात जास्त टँकर लागतील, असा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. त्यातच पेठ, सुरगाणा, हरसूल आणि सिन्नर या भागांत मोठ्या प्रमाणात टँकरची गरज भासेल, अशी सर्वसाधारण स्थिती आहे. आजघडीला इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर, पायरवाडी, खडकवाडी, तळ्याचीवाडी, बकुळीचीवाडी, बैरोबावाडी या पाड्यांसाठी पाणी टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल झाला असून, त्याला मान्यता देण्यात आली आहे. लवकरच टँकरच्या फेऱ्या सुरू होतील.
सध्या जिल्ह्यातील सात मोठ्या, मध्यम १७ धरणांमध्ये ४५ टक्क्यांंहून अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे, तर गंगापूर धरण समूहात ५९ टक्के पाणीसाठा आहे. मार्च अखेरच्या टप्प्यात उष्मा वाढला. एप्रिल व मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातून धरणांतील पाण्याचे होणारे बाष्पीभवन, उपसा वाढून जलसाठ्यात घट होण्याची शक्यता लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच भूजल पातळी कमी होऊन सार्वजनिक विहिरी, विंधन विहिरींची पाणीपातळीही कमी होईल. त्यातून येत्या दिवसांत वाड्या- वस्त्यांना टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता गृहीत धरण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या भागांतील वाड्या- वस्त्यांवर टंचाईच्या झळा अधिक जाणवतात. इगतपुरी येथे पाण्यासाठी महिलांनी मोर्चा काढल्याने एक टँकर सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ४८४ गावे व ५६७ वाड्यांना एकूण १४७ टँकर लागतील, अशी शक्यता गृहीत धरून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये ४६ गावांमध्ये विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यासाठी २० लाख ७० हजार, तर १४६ गावांतील खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ९५ लाख 3१ हजार रुपयांची तरतूद आहे. ८१४ ठिकाणी टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ७ कोटी ७० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.