

नाशिक : लहान-मोठी तब्बल 319 धरणे असलेल्या उत्तर महाराष्ट्रात गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक जलसाठा असला, तरी उन्हाची तीव्रता टंचाईच्या झळा वाढविणारी ठरली आहे.
नाशिक विभागातील 162 गावे, 557 वाड्यांमध्ये सद्यस्थितीत 172 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अहिल्यानगरात सर्वाधिक 90, तर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात 74 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चालू मे आणि जून महिन्यांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने टंचाई कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाच्या दाव्यानुसार, गतवर्षीच्या तुलनेत यंदा विभागातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील 102 लहान-मोठ्या धरणांमध्ये गतवर्षी 24.84 टक्के जलसाठा होता. यंदा 29.72 टक्के आहे. धुळ्यातील 56 प्रकल्पांमध्ये 53.59 टक्के, जळगावातील 113 प्रकल्पांत 40.70 टक्के इतका साठा आहे. नंदुरबारमधील आठ प्रकल्पांमध्ये 60.37 टक्के इतका आहे. तापमानाचा वाढता पारा आणि धरणांतील जलसाठा वेगाने घटण्याची शक्यता लक्षात घेत यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
विभागात 27 शासकीय, तर 145 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी याच कालावधीत विभागात 573 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्या तुलनेत टँकरसंख्या तिपटीने कमी असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 77 गावे, 155 वाड्यांमध्ये 74 टँकरद्वारे, जळगावमध्ये 7 गावांमध्ये 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत सद्यस्थितीत एकही टँकर सुरू नाही.
सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव येथे दहा, चांदवडला चार, तर येवल्यात तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय. सिन्नर, पेठ, मालेगावला दोन, तर सटाणा, त्र्यंबक, इगतपुरी, ओझर, दिंडोरी, देवळा याठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जळगावमधील पारोळ्याला दहा, भुसावळ, बोदवडला आठ, तर, चाळीसगाव, अमळनेरला चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. धुळ्यातील शिंदखेडा येथे चार, तर दोंडाईचाला दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक जलसाठा आहे. पाणीटंचाई जाणवत असलेली गावे, वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाई कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत.
डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक