Water issue of Nashik | पाण्याची पळवापळवी आता बस!

समान वितरणाचे आयुक्तांचे आदेश; कारवाईसाठी भरारी पथके
water issue
पाणीटंचाईpudhari
Published on
Updated on

नाशिक : व्हॉल्वमनला हाताशी धरून 'गब्बर' माजी नगरसेवकांकडून केली जाणारी पाण्याची पळवापळवी आता थांबणार आहे. शहरात पाण्याचे समान वितरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले असून पाणीपुरवठ्याविषयी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच पाणी चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे स्काडा वॉटर मीटर प्रणालीअंतर्गत प्रत्येक जलकुंभाला जलमापक अर्थात मीटर बसविण्यात येत असून या प्रणालीद्वारे पाणीपुरवठ्याचे ऑडीटही केले जाणार आहे.

Summary

आयुक्तांचे निर्देश

  • नाशिककरांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

  • पाणी उपसाकरीता नळांना जोडलेल्या मोटारी जप्त करणार

  • तोट्या नसलेल्या नळजोडणींचा पुरवठा बंद करणार

  • पाणीपट्टी थकबाकी वसुली प्रभावीपणे करणार

  • अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर होणार कारवाई

नाशिक शहरातील लोकसंख्या 25 लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरात सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक मिळकती आहेत. महापालिकेच्या घरपट्टी सदरी सव्वा पाच लाख मिळकतींची नोंद आहे. त्यातही नळकनेक्शनधारकांची संख्या मात्र सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक नाही. गंगापूर, मुकणे, दारणा धरणांतून उचलण्यात येणाऱ्या एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत हिशेबबाह्य पाणीवापर 41 टक्के इतके आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्याचे दिसत आहेत. त्यातच व्हॉल्वमनला हाताशी धरून काही बाहुबली माजी नगरसेवक आपल्या प्रभावक्षेत्रातील नागरिकांनाच अधिकवेळ पाणीपुरवठा करतात. विरोधकाच्या प्रभागात मात्र कमी वेळ कमी दाबाने पाणीपुरवठा करतात, अशा तक्रारी आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील शहरांमध्ये असमान पाणी वितरणाच्या तक्रारी आल्या होत्या. ऐन पावसाळ्यात अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते. आयुक्त खत्री यांनी सोमवारी (दि.27) झालेल्या खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत पाणीपुरवठा विषयीच्या तक्रारींबाबत चर्चा केली. या तक्रारींची शहानिशा करताना याप्रकारामागे नेमके कोण आहे याचा छडा लावण्यासाठी आयुक्तांनी जलशुद्धीकरण केंद्रापासून जलकुंभापर्यंत नेमके किती पाणी येते याचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्काडा वॉटर मीटर प्रणालीचे काम मार्चअखेर पूर्ण होईल. त्यानंतर असमान वितरणाचा प्रश्न पुरेशा प्रमाणात निकाली निघेल, असे आयुक्त खत्री यांनी सांगितले.

आयुक्त देणार अचानक भेटी

शहरातील पाणीचोरीवर आता आयुक्त खत्री यांचे लक्ष असणार आहे. काही हॉटेल्स, व्यवसायिक आस्थापना तसेच खाजगी पाणीपुरवठा करणाऱ्यांकडून पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी आयुक्त स्वत: अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत. पाणीचोरी आढळल्यास तत्काळ नळ कनेक्शन खंडीत केले जाणार असून संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल केला जाणार आहे.

महापालिकेला हवे 6200 दशलक्ष घनफूट पाणी

शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता पाणीवापर लक्षात घेता आगामी वर्षाकरीता गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून नाशिककरांसाठी 6200 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहे. गेल्या वर्षाच्या मागणीपेक्षा यंदा 100 दलघफू मागणी जादा नोंदवली असून त्यात गंगापूर धरणातून 4500, मुकणेतून 1500 तर दारणातून 200 दलघफू पाण्याचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news