नाशिक : घरपट्टी, पाणीपट्टी देयकांच्या वाटपासाठी महापालिकेने खासगी अभिकर्त्यांची नेमणूक केली आहे. येत्या दोन दिवसांत या अभिकर्त्यांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. ग्राहकांना घरपट्टी व पाणीपट्टीच्या देयकाची सत्वर अदायगी करता यावी यासाठी ॲप उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रत्येक मिळकतधारकाला स्वतंत्र ओटीपी दिला जाणार आहे. या ओटीपीच्या आधारे करदात्यांना आपल्या देयकाची ऑनलाइन अदायगी करता येणार आहे.
मनुष्यबळाच्या अभावामुळे घरपट्टीची थकबाकी सहाशे कोटींवर, तर पाणीपट्टीची थकबाकी दीडशे कोटींवर पोहोचली आहे. देयके वाटप करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे करदात्यांची पावलं महापालिकेच्या कर संकलन केंद्रांकडे वळत नाहीत. त्यामुळे थकबाकीचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे प्रभावीपणे करवसुली होण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीच्या देयक वाटपांचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. घरपट्टीसाठी पंचवटी व नाशिक रोड तसेच सिडको व सातपूर आणि नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम अशा प्रत्येकी दोन विभागांसाठी एका एजन्सीकडे बिले वाटपाचे काम दिले जाणार आहे. येत्या दोन दिवसांत या तिन्ही एजन्सींना कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त श्रीकांत पवार यांनी दिली आहे. देयके वाटपाची कामे करण्याकरिता पात्र ठरलेल्या संस्थांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वयंसेवी संस्था, आर्यन इंटरनॅशनल तसेच ऋषिकेश एंटरप्रायजेस या तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टीची देयके तथा बिले वाटप करण्यासाठीदेखील खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, पाणीपट्टीची देयके ही एकाच संस्थेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे उपआयुक्त पवार यांनी सांगितले.
घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटप खासगी अभिकर्त्यांमार्फत केले जाणार आहे. घरपट्टी देयक वाटपासाठी तीन अभिकर्त्यांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. त्याचबरोबर करदात्यांच्या सुविधेसाठी स्वतंत्र ॲपही तयार केले जाणार आहे.
श्रीकांत पवार, उपआयुक्त (कर), नाशिक महापालिका.