जुने नाशिक : वक्फ बोर्ड संदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकामुळे वक्फची मालमत्ता वाचवण्यासाठी राज्यस्तरीय चळवळ सुरू करण्यात आली आहे. राज्यातील वक्फ जमिनी संरक्षणासाठी तहरिक-ए-औकाफ चळवळ तसेच, केंद्र शासनाचे वक्फ बोर्ड संशोधन विधेयक रद्द करण्यासंदर्भातील जनजागृती करण्याबाबत २८ सप्टेंबर रोजी पुण्यात राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आल्याची माहिती तहरिक-ए-औकाफचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी नाशिकमध्ये दिली.
वक्फ म्हणजे इस्लाम धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्तीने आपल्या चल किंवा अचल संपत्तीचे ईश्वराच्या नावाने कायमस्वरूपी केलेले दान होय, असे शब्बीर अन्सारी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले. अन्सारी यांच्या उपस्थितीत उर्दू अभ्यासिका बागवानपुरा, खिदमत- ए- खल्क कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर येथे वक्फ मालमत्तेबाबत बैठक पार पडली. यावेळी हाफिज समीर कोकणी, हाजी झाकिर अन्सारी, ओबीसी सेल शहराध्यक्ष फारूख बागवान, ॲड. एम. क्यू. सय्यद, ॲड. अन्सार सय्यद, काँग्रेस अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष हनिफ बशीर शेख, सोहेल काजी, तौफिक हाजी, इसहाक कुरेशी, आसिफ शेख आदी उपस्थित होते.