

नाशिक : ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ या म्हणीचा आधार घेतल्यास उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्पांची स्थिती लक्षात येईल. मागील काही वर्षांचा विचार केल्यास, उत्तर महाराष्ट्रातील ‘उद्योग’ हा निव्वळ घोषणांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाताना दिसून येत आहे. गेल्या 20 वर्षांपासून नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये एकही मोठा उद्योग जमिनीवर स्थिरावला नाही. मात्र, घोषणांमधून उत्तर महाराष्ट्र ‘उद्योग’संपन्न असल्याचे खुबीने दर्शविले गेले. अशात नवे सरकार उत्तर महाराष्ट्रात मोठ्या समूहाच्या उद्योगाची चणचण दूर करणार काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सुपीक शेतीसाठी ओळखल्या जाणार्या नाशिक जिल्ह्यात उद्योगाची चाके स्थिरावली असली तरी, त्याला गती देण्याची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणामध्ये नाशिक अद्यापही मुंबई, पुण्याच्या तुलनेत उद्योगात मागे आहे. नाशिकच्या पुढे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर उद्योगात कूच करीत आहेत. अशात नाशिकही औद्योगिकद़ृष्ट्या संपन्न व्हावे, यासाठी स्थानिक औद्योगिक संघटनांकडून प्रयत्न केले जात आहेत; मात्र त्यांची घोषणांवरच बोळवण केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात मागील 50 वर्षांपासून मोठ्या समूहाचा उद्योग आला नसल्याने जिल्ह्याचा विकास खोळंबला आहे.
दुसरीकडे औद्योगिकद़ृष्ट्या मागास म्हणून ओळखल्या जाणार्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही राज्यकर्त्यांकडून निव्वळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. 2022 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत खांदेशात 1310 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली गेली. प्रत्यक्षात ही गुंतवणूक कुठे केली याचा आजही शोध घेतला जात आहे. अशात नव्या सरकारकडून समुद्धी महामार्गाला ‘कनेक्ट’ असलेल्या नाशिकसह खांदेशच्या औद्योगिक विकासाला बळ दिले जाईल काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.