K.V.N Naiks
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थाFile Photo

V.N. Naik Sanstha Election | प्रचार अंतिम टप्प्यात; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था निवडणूक

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, शनिवारी (दि. २७) मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत चार पॅनल असल्याने जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मतदानाला चार दिवस राहिले असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे.

क्रांतिवीर विकास पॅनलच्या माध्यमातून पंढरीनाथ थोरे, शिवाजी मानकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण, व्यवसायाभिमुख कोर्सेस यांवर भर दिला आहे. परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून कोंडाजी आव्हाड, बाळासाहेब सानप हे गेल्या निवडणुकीतील हुकूमशाहीवर जोर देत आहेत. तर प्रगती पॅनलच्या माध्यमातून तानाजी जायभावे, हेमंत धात्रक हे संस्थेची नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रगती कशी करायची हा मुद्दा घेऊन रिंगणात आहेत. नवऊर्जा पॅनलने प्रस्थापितांविरुद्ध लढा, अशी भूमिका घेतली आहे.

आमच्या पॅनलमध्ये मी स्वत: जि. प.चा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. बाजार समितीवर वर्चस्व आहे. कमलेश बोडके हे गेल्या चार टर्मपासून नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत तसेच सभागृहनेता, विभाग सभापती असा प्रशासकीय पदांचा अनुभव आहे. सरचिटणीससाठी असलेले शिवाजी मानकर हे माहिती व जनसंपर्क संचलनालयाचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. मंत्रालयासह विविध जिल्ह्यांतील प्रशासकीय कामाचा त्यांना ३० ते ३५ वर्षांचा अनुभव आहे. उत्कृष्ट अधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. कचेश्वर दिघोळे हे नायगाव येथील धनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन असल्याने त्यांना प्रशासकीय अनुभव आहे.

- पंढरीनाथ थोरे, क्रांतिवीर विकास पॅनल

गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ताधारी पॅनलमुळे नाईक शिक्षण संस्थेचा दर्जा घसरला आहे. ही संस्था १० वर्षे मागे गेली आहे. मी स्वत: सत्तेत असताना शिक्षणसंस्थेची प्रगती झाली पण मागील पाच वर्षांमध्ये ती झाली नाही.उदय घुगे हे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक असून, शिक्षित असे उमेदवारआहेत. बाळासाहेब सानप यांना विधानभवनात काम केल्याचा चांगला अनुभव आहे. त्यांचा संस्थेला फायदा होईल. ॲड. जयंत सानप हेदेखील विधीज्ञआहेत.

- कोंडाजी आव्हाड, परिवर्तन पॅनल

मागील पाच वर्षांमध्ये शिक्षकांना वेळेवर पगार दिला नाही. आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचे काम केले. प्रत्यक्षात २८ कोटी रुपयांऐवजी ५० कोटी शिल्लक पाहिजे होती. खर्च केले असते तर गुणात्मक दर्जा सुधारला असता. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे संस्थेचा दर्जात्मक विकास झाला नाही. आमच्या पॅनलमध्ये सर्व अनुभवी उमेदवार आहेत. मी स्वत: संस्थेच्या संचालक मंडळात काम केले आहे. हेमंत धात्रक यांना शिक्षण क्षेत्रातील जाण आहे. तसेच नामकोमध्ये त्यांचे काम चांगले आहे. तर दिगंबर गिते हे ग्रामीण भागातील चेहरा ओळखला जातो.

- ॲड. तानाजी जायभावे, प्रगती पॅनल

संस्थेतील अनेक सभासद शिक्षित नाहीत पण त्यांना १९९० मध्ये सभासदत्व देण्यात आले. त्याचे दुष्परिणाम नाईक शिक्षण संस्थेला भोगावे लागत आहेत. या कारणामुळे इतर संस्थांच्या तुलनेत नाईक शिक्षण संस्थेचा दर्जात्मक विकास झालेला नाही. आमच्या पॅनलमध्ये मी स्वत: उच्चशिक्षित आहे. स्व. तुकाराम दिघोळे यांचे चिरंजीव अभिजित दिघोळे हे गेल्या निवडणुकीत अवघ्या एका मताने निवडले गेले आहेत. तर संदीप फड यांचेही संस्थेत योगदान आहे.

- मनोज बुरकुले, नवऊर्जा पॅनल

logo
Pudhari News
pudhari.news