

कुसुमाग्रजनगरी : पुढारी वृत्तसेवा
आजची युवा पिढी अधिक सक्षम आणि संवेदनशील आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग आणि संस्कारांची जाणीव ठेवून वाटचाल केली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांच्या हाती मराठी भाषेचे भविष्य निश्चितच सुरक्षित असल्याचा विश्वास 'मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग' या विषयावरील परिसंवादात उमटला.
विश्व मराठी संमेलनात रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित 'मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग' या परिसंवादात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी सहभाग घेतला. अभिजित ब्रह्मनाथकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे उपस्थित होते.
यावेळी आजचा युवा विचार कसा करतो, त्याच्यासमोरील आव्हाने, भाषेचे आव्हान ते कसे पेलणार आणि इतर भाषेची नव्या पिढीत झालेली सरमिसळ आदी बाबींवर वक्त्यांनी संवाद साधला. डॉ. गोहे म्हणाल्या, मराठी भाषा नवीन पिढीच्या तोंडी नवे रूप घेऊन येत आहे. त्यात आपल्याला स्थित्यंतर दिसते. अर्थात, मोबाइलच्या अतिवापरामुळे, कुटुंबपद्धती बदलामुळे अनेक प्रश्न समोर उभे ठाकल्याचे त्यांनी नमूद केले.
मोबाइलचा वापर आपण कसा होता, यावरही बरेच अवलंबून आहे. तरुण पिढी जे लेखन करते, ते आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व असल्याचे त्या म्हणाल्या. प्रेम आणि हिंसा हे एकतर हातात हात घालून चालत आहेत हे थोडेसे चिंता निर्माण करणारे असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. तसेच आपण संयुक्त कुटुंबपद्धतीचे उदात्तीकरण करतो. पण हळूहळू चौकोनी आणि नंतर त्रिकोणी कुटुंब झाले आहे. कुटुंबात लोकशाही नाही हे वास्तव काहीवेळा जाणवते.
मुलांना त्यांचे पार्टनर निवडण्याचा अधिकार तरी कुटुंबात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठी भाषा युवक मंडळ स्थापन करणे आणि त्यासाठी अनुदान देणे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवकांसाठी लिहायला प्रोत्साहन मिळेल, असे व्यासपीठ आवश्यक असल्याचे उपसभापती डॉ. गो-हे म्हणाल्या.
अतिरिक्त पोलिस महासंचालक नांगरे-पाटील यांनी जेन झी पिढी काळाप्रमाणे बदलणारी आहे. क्रियाशील आहे. कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे कौशल्य या पिढीत असल्याचे सांगत अमेरिकेसारख्या देशात इंटरनेटचा अतिवापर आणि त्यामुळे युवा पिढीवर झालेले दुष्परिणाम जगासमोर आहेत.
मात्र, आपल्या येथील पिढी ही संस्कारांनी पोसलेली असल्याने त्यांना मागील पिढीच्या कष्टांची जाणीव आहे. त्यामुळेच विचारांशी ही पिढी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाषा ही प्रवाही असते. संस्कार देणारे घटक कुठे आहेत हे महत्त्वाचे आहे.
कुटुंबातील आई वडील, शाळा, कॉलेज इथेच संस्कारांची बीजे पेटली जातात. जुनी भाषा आता बदलली आहे. नवीन पिढीच्या ओठी नवे शब्द आहेत, असे सांगून बदलते संदर्भ आणि भाषा, त्यानंतर रेव्ह पार्टीवर मारलेली धाड याची माहिती त्यांनी दिली.
आजची पिढी अधिक कौशल्यपूर्ण आणि कर्तृत्ववान असल्याचे ते म्हणाले. सचिव कुलकर्णी आणि देवरे यांनी उपसभापती डॉ. गोहे आणि विश्वारे नांगरे पाटील यांचे स्वागत केले.