

नाशिक : कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त (दि. २७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो. यंदा हा सोहळा अधिक विशेष ठरणार आहे, कारण त्यांच्या जन्मस्थळी, नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे गावाला राज्यातील दुसरे 'कवितेचे गाव' हा मान मिळणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मराठी भाषा विकासमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २७) होणार आहे. शिरवाडे वणी (ता. निफाड) ग्रामपंचायतीने 'कवितेचे गाव' हा दर्जा मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. शासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नाशिकमधील मराठी प्रेमींनीही आनंद व्यक्त केला आहे.
राज्यात यापूर्वी राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून थोर कवी मंगेश पाडगावकरांचे उभा दांडा (वेंगुर्ले) हे गाव 'कवितेचे गाव' म्हणून विकसित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे गावीही असेच एक 'कवितेचे गाव' साकारले जाणार आहे. या प्रकल्पात कुसुमाग्रज यांच्या कवितांसह अन्य थोर कवींच्या साहित्याचाही समावेश केला जाणार आहे. 'मराठी भाषा गौरव दिन' या विशेष दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा विभागाने शिरवाडे गावात 'कवितेचे गाव' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेचा अभिमान वृद्धिंगत व्हावा आणि 'कवितेचे गाव' म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण जगात लौकिक मिळवावा, या उद्देशाने या प्रकल्पाची रचना करण्यात येणार आहे.
कवितेच्या गावी १५ दालने उभी केली जाणार असून, त्यातील पहिल्या दालनाचे उद्घाटन मराठी भाषादिनी सकाळी अकरा वाजता करण्यात येईल. त्यानंतर उर्वरित इतर दालनांसाठी कृती आराखडा तयार केला जाणार असून, त्यानंतर ही दालने टप्प्याटप्प्याने उभी करण्यात येतील.
विकासमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत शिरवाडे गावात गुरुवारी (दि.२७) कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच दिलीप खैरे, नियोजन समितीचे अध्यक्ष शरद काळे, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी केले.