Vidhan Sabha Election 2024 | प्रचार तोफा थंडावल्या; उद्या मतदान

आता रॅली, चौक सभा, भेटीगाठीने शेवटचा दिवस गाजला
Vidhan Sabha Election 2024
प्रचार तोफा थंडावल्या; उद्या मतदानpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोमवारी (दि.18) प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आपआपले मतदारसंघ पिंजून काढत नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले. उमेदवारांसह पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी झालेल्या रॅली, चौक सभा आणि गाठीभेटीमुळे अखेरचा दिवस चांगलाच गाजला. मतदानाला आता अवघा एक दिवस उरल्याने गुप्त गाठीभेटी तसेच अंतर्गत घडमोडींना वेग येणार आहे. बुधवारी (दि. 20) मतदान असल्याने प्रशासनाकडून संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

मतदारसंघात प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी जवळपास सर्वच उमेदवारांनी पायी अन् बाइक रॅली काढत राळ उठवून दिली. बहुतांश सर्वच उमेदवारांनी सकाळ आणि सायंकाळच्या चाैक सभा घेत, मतदारांना साद घातली, अनेक भागात उमेदवारांनी रोड- शो केले. सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा शांत थंडावल्या. मात्र, आता गुप्त गाठीभेटी तसेच अंतर्गत घडामोडींना वेग येणार आहे.

सभा, रॅली, बैठका, भेटीगाठीसाठी उमेदवार दारोदार फिरताना दिसून येत होते. नाशिक जिल्ह्यातील 15 ही मतदारसंघांत पहिल्या दिवसापासून प्रचाराची राळ उठवून दिली गेली. त्यात नेत्यांच्या सभांनी मोठी भर घातली. जिल्ह्यात देशभरातील प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्याने निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. कौल कुणाला याचा फैसला २३ नोव्हेंबर रोजी होणार असला, तरी सद्यस्थितीत जिल्ह्यातील 15 ही जागांवरील लढती चुरशीच्या होतील, असे चित्र सध्यातरी बघावयास मिळत आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवाराने सर्व ताकद पणाला लावत मतदारसंघात 'हवा' निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी (दि. १८) भल्या पहाटेपासूनच प्रचाराला सुरुवात झाली. बहुतांश उमेदवारांनी मतदारसंघातील जॉगिंग ट्रॅक गाठत मतदारांशी पुन्हा एकदा संवाद साधत मतदानाची आठवण करून दिली. त्यानंतर सकाळी ७ ते ११ पर्यंत मतदारसंघात बाइक रॅली काढली. यात उमेदवारही कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाल्याचे दिसून आले. ११ नंतर पायी रॅली काढली. यावेळी उमेदवारांनी घरोघरी भेटीगाठी घेतल्या. चौकाचौकात उभ्या असलेल्या मतदारांशी संवाद साधला. काही भागांत मतदारांनी रोड शो करीत, मतदारांना साद घातली, तर कुठे दिवसाच चौक सभा घेत नागरिकांशी संवाद साधला. दुपारी ४ नंतर पुन्हा एकदा उमेदवारांनी महिला, पुरुषांची रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. सायंकाळी ६ पर्यंत जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवारांनी सर्व शक्तिनिशी प्रचार करीत शेवटचा दिवस गाजविल्याचे दिसून आले.

कंपन्यांच्या गेटवर उमेदवार

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात अंबड आणि सातपूर या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक वसाहती असून, कंपन्यांमध्ये कार्यरत कामगार मतदारांची या भागात मोठी संख्या आहे. त्यामुळे उमेदवारांनी बहुतांश कंपन्यांबाहेर उभे राहात येणाऱ्या- जाणाऱ्या कामगारांकडे मतांसाठी साद घातली. तिन्ही शिफ्टमध्ये कुणी ना कुणी उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर उभे असल्याचे दिसून आले.

भोंग्यांचा आवाज शांत

गेल्या ३४ दिवसांपासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचार रथांवर लावलेल्या भोंग्यांचा आवाज मतदारांच्या कानी पडत होता. बहुतांश उमेदवारांनी आपल्या समर्थनार्थ गाणी तयार केली होती. हे प्रचार रथ संपूर्ण मतदारसंघात फिरविले गेले. सोमवारी सायंकाळी ६ नंतर या भोंग्यांचा आवाज शांत झाला.

संपूर्ण कुटुंब उतरले मैदानात

प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारात उतरल्याचे दिसून आले. उमेदवाराला सर्व ठिकाणी जाणे शक्य नसल्याने, उमेदवाराच्या कुटुंबीयांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना साद घातली.

रात्री भेटीगाठींचा जोर

सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार थांबल्यानंतरही उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठीचा जोर कायम होता. रात्री उशिरापर्यंत उमेदवार, त्यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते लपूनछपून प्रचार करताना दिसून आले. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून यावर बारीक लक्ष असून, अशा बाबींवर नियंत्रण आणण्यासाठी पथकाकडून सातत्याने पाहणी केली जात असल्याचेही दिसून येत आहे.

मतदानासाठी भरपगारी सुटी

मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा व सवलतीचा फायदा घेऊन मतदान करावे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना ही सवलत लागू राहील. यात खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news