

देवगाव (नाशिक) : निफाड तालुक्यातील वाहनधारकांमध्ये एलईडी हेडलाईट्स वापरण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. अनेक वाहनचालक नियमबाह्यपणे अधिक तेजस्वी प्रकाश देणारे एलईडी हेडलाईट्स बसवत आहेत. त्यामुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दिपल्याने अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर एलईडी हेडलाईट्सचा वापर करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहन युनिक दिसावे, उठून दिसावे यासाठी अनेकजण आपल्या गाड्यांमध्ये अधिक तीव्र प्रकाशाचे एलईडी हेडलाईट्स बसवतात. विशेषतः कार, जीप आणि दुचाकींमध्ये हेडलाईटच्या शेजारी उच्च क्षमतेचे एलईडी दिवे लावले जातात. हे दिवे इतके तेजस्वी असतात की समोरून येणाऱ्या वाहनचालकाला डोळे मिटावे लगतात किंवा थांबवे लागते. त्यामुळे वाहनाचा ताबा सुटण्याची शक्यता निर्माण होते, आणि अपघात घडतो.
वाहन उत्पादक कंपन्या हेडलाईट्स विशिष्ट निकषांनुसार तयार करतात आणि त्यांना संबंधित विभागाची परवानगी प्राप्त असते. मात्र, बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या डेकोरेटिव्ह एलईडी हेडलाईट्सच्या माध्यमातून अनेक वाहनचालक वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरबदल करतात. हे बदल वाहतूक नियमांचे सरळसरळ उल्लंघन असूनही, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिवहन विभागाच्या मानकांनुसारच वाहन उत्पादक कंपन्या हेडलाईट्स तयार करतात. त्या विविध चाचण्या पार केल्यानंतरच वापरण्यास मंजूर होतात. परंतु बाजारात मिळणारे एलईडी दिवे कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय विना चाचणी वापरले जात आहेत. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
भास्करराव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, लासलगाव पोलिस ठाणे
रात्री प्रवास करताना पादचारी, दुचाकीचालक आणि वृद्ध नागरिकांना या तीव्र प्रकाशामुळे त्रास सहन करावा लागतो. डोळे दिपल्याने काही वेळा अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे प्रशासनाने बेकायदेशीर एलईडी हेडलाईट्सची विक्री आणि बसविणे यावर बंदी घालावी. तसेच, वाहने थांबवून तपासणी करून दोषी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.