

मनमाड : एकीकडे बाजार समितीत कांदा भावात सुधारणा होऊन गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिन्यात चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असताना दुसरीकडे मात्र टोमॅटो, कोबी, मेथी, कोथंबीर आणि शेपूच्या भावात मोठी घसरण झाली आहे. शेपूची एक जुडी अवघ्या दीड रुपयाला तर कोथिंबिरीच्या एका जुडीला केवळ तीन रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवादिल झाले आहेत.
कांदा आणि मका नगदी पीक मानले जाते. त्यामुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी या पिकांची लागवड करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून कांदा शेतकऱ्यांचा वांदा करत आहे. यंदाही उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. परंतु, महिनाभरापासून कांद्याच्या भावात होत असलेल्या घसराणीला ब्रेक लागून भावात चांगली सुधारणा झाली आहे. सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2100 ते 2200 रुपये इतका भाव मिळत आहे. गेल्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात प्रति क्विंटल सरासरी 900 ते 1000 रुपये भाव मिळाला होता. एकीकडे कांद्याच्या भावात सुधारणा झालेली असताना दुसरीकडे टोमॅटोच्या भावात सर्वाधिक घसरण झाली आहे. 20 किलोच्या एका क्रेटला 60 ते 65 रुपये इतकाच भाव मिळत आहे. कोबी आणि मेथीची परिस्थिती काही वेगळी नाही त्यांनाही 3 ते 5 रुपये भाव मिळत आहे.
कष्टाने पीकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून टोमॅटो सोबत भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तिकडे बाजार समितीत टोमॅटो आणि भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असताना दुसरीकडे मात्र मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात आजही नागरिकांना चढ्या भावाने टोमॅटो आणि भाजीपाला का घ्यावा लागत आहे असा प्रश्न शेतकऱ्यांनीं उपस्थित करत एका प्रकारे दलाल ग्राहकांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.
भाजी - दर
शेपू - 1.50 रुपये जूडी
कोथंबीर - 3 रुपये जुडी
कोबी - 3 रुपये नग
मेथी - 5 रुपये जूडी
टोमॅटो - 6 रुपये किलो
वाल -10 रुपये किलो
वांगे -12 रुपये किलो
शेवगा -30 रुपये किलो