

लासलगाव : राकेश बोरा
भारतीय शेतीने पारंपरिक पातळीवर यश संपादन केले असले तरी, आता प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून जागतिक बाजारातही आपली छाप उमटवली आहे. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत भारताने सुमारे ४.९५ लाख मेट्रिक टन प्रक्रिया केलेल्या भाजीपाल्याची निर्यात करून ६०३४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवले आहे.
भारताने केलेली ही निर्यात प्रामुख्याने यूएसए, फिलिपाइन्स, युके, थायलंड आणि युएईमध्ये, जर्मनी, कॅनडा, साऊथ आफ्रिका, ब्राझील, मलेशिया आदी देशात झाली आहे.
एपीडा (अपेडा) आकडेवारीनुसार, २०२३- २४ आर्थिक वर्षात भारताने एकूण ५.३७ लाख मेट्रिक टन प्रक्रिया केलेल्या भाजीपाल्याची निर्यात केली असून, त्यातून तब्बल ६५२३ कोटी रुपयांचे परकीय चलन देशात आले आहे. ही आकडेवारी केवळ आर्थिक महत्त्व अधोरेखित करत नाही, तर रोजगारनिर्मितीच्या शक्यतांनाही अधिकृत स्वरूप देत आहे. भाजीपाल्याचे पोषणमूल्य, त्यातील जीवनसत्त्वे, प्रथिने आणि पचनास सोपा स्वभाव यामुळे आज जागतिक आहारतज्ज्ञही त्याच्या नियमित सेवनावर भर देत आहेत. यामुळे प्रक्रिया केलेल्या स्वरूपातही या भाज्यांना परदेशात मोठी मागणी आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मामुळे कोविडनंतर जागतिक आरोग्यदृष्टिकोनही बदलला आहे, आणि त्याचा फायदा भारतीय उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
कांदे, काकडी, मशरूम, हिरवी मिरची, लसूण, शतावरी, स्वीटकॉर्न, ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांचे सुकवलेले, निर्जलित किंवा इतर प्रकारात रूपांतर करून त्यांचे शेल्फ लाइफ वाढवता येते आणि हेच उत्पादन अधिक स्पर्धात्मक बनते. महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. या राज्यांमध्ये प्रक्रिया उद्योगाला जोडल्यास स्थानिक पातळीवरही विकासाची गती वाढू शकते.
प्रक्रियायुक्त पदार्थांची वाढती मागणी पाहता, रेसिड्यू- फ्री अर्थात विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन हे काळाची गरज आहे. जागतिक बाजारपेठा आता गुणवत्तेबाबत अधिक सजग झाल्या आहेत. त्यामुळे भारताने या बदलत्या निकषांशी जुळवून घेत निर्यातक्षम उत्पादन विकसित केलं पाहिजे.
सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव, नाशिक.
विषमुक्त (रेसिड्यू-फ्री) उत्पादन वाढवणे. सौरऊर्जा आधारित प्रक्रिया केंद्रांची उभारणी. शेतीपूरक उद्योगांना आर्थिक सवलती. निर्यात प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता हवी.
भाजीपाल्याच्या प्रक्रियेमुळे केवळ उत्पन्न वाढत नाही, तर रोजगारनिर्मिती, अन्नसुरक्षा व ग्रामीण विकासालाही गती मिळते. त्यामुळे याकडे एक धोरणात्मक क्षेत्र म्हणून पाहणे आवश्यक आहे.
शेखर कदम, भाजीपाला उत्पादक, नाशिक.