नाशिक : सुवासिनींच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय म्हणजे वटपौर्णिमा. अखंड सौभाग्य आणि पतीला चांगले आरोग्य लाभावे, याकरिता महिलांनी वटवृक्षाला साकडे घातले. यंदाचे वडपूजन मात्र दोन दिवस असल्याने मंगळवारी (दि. १०) नववधूसह काही महिलांना वटपौर्णिमेचे पूजन करता आले नाही. मात्र, अशा महिलांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे बुधवारी (दि. ११) दुपारी १:१५ पर्यंत त्यांना वडाचे पूजन करता येणार आहे.
सौभाग्याचा दिवस अन् सात जन्म हाच पती मिळावा यासाठी महिलांनी साजशृंगार करत उपवास ठेवत वडाला धागा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला सात फेरे पूर्ण केले. वटसावित्रीचे व्रत पूर्ण केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात सुख प्राप्त होते, अशी महिलांची धारणा आहे.
यंदा मंगळवारी (दि. १०) 11.30 नंतर पौर्णिमेला प्रारंभ झाल्याने महिलांनी दुपारनंतर वटपूजन केले. बुधवारी (दि. ११) सूर्याने पाहिलेली तिथी याही दिवशी दुपारी १.१५ पर्यंत पौर्णिमा राहणार असल्याने यंदा दोन दिवस सुवासिनीेंना वटपूजनाची संधी मिळणार आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या महिलांना पूजा करता आली नाही, त्यांनी बुधवारी (दि. ११) वडाचे पूजन करावे असे ज्योतिष शास्त्राकडून सांगण्यात आले आहे.
भ्रदा योग असला, तरी साजरी करा वटपौर्णिमा - भ्रदा योग असला, तरी साजरी करा वटपौर्णिमाभद्रा योग हा विशेष ज्योतिषशास्त्रीय योग आहे, जो पंचांगानुसार तिथी, वार, नक्षत्र आणि करण यावर आधारित असतो. भद्रा योग हा “भद्र करण” असल्यास तयार होतो. हा योग शुभ कार्यांसाठी अशुभ मानला जातो. लग्न, नवीन व्यवसाय, गृहप्रवेश, नामकरण, यात्रा यांसारख्या शुभ कार्यांमध्ये भद्रा योग टाळणे योग्य मानले जाते. या काळात वाद, अपघात, अडथळे, किंवा कामात विघ्ने येण्याची शक्यता वाढते असे मानले जाते. त्यामुळे पंचांग पाहूनच कार्य ठरवावे. काही धार्मिक कार्यांसाठी तसेच वटपौर्णिमा पूजेसाठी मात्र भद्रा योग वर्ज्य नसतो. साधारणपणे वटपौर्णिमा ही कायम भद्रामध्ये येते. परंतु, या गोष्टीचा काही संबंध नसल्याने सुवासिनींनी मनात कोणताही किंतु परंतु न आणता मनोभावे वटपूजन करावे.
नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक व ज्योतिष विद्यापाचस्पती.