

नाशिक : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार श्रीमंत धार्जिणे असून, त्यांच्या 'अँटी इमिग्रंट' भूमिकेचा अमेरिकेलाही फटका बसत असल्याचा आरोप अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे मिशिगनचे खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी नाशिकमध्ये केला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सोडवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीची गरज भासली नाही आणि ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेचा थेट सहभाग होता असे वाटत नाही, असे स्पष्ट मतही ठाणेदार यांनी व्यक्त केले.
येथील वसंत व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी ठाणेदार नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या भूमिकेवर भाष्य केले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यात झालेला तणाव, आॉपरेशन सिंदूर आणि या दोन्ही राष्ट्रांतील अमेरिकेच्या मध्यस्थीवरही त्यांनी मत व्यक्त केले. दहशतवाद हे जागतिक संकट आहे. मग तो इस्रायलवरील हल्ला असो, ९/११ चा अमेरिका हल्ला असो वा पहलगाममधील घटना असो. अशा प्रकारच्या घटनांनंतर नागरिकांचे संरक्षण करणे हे त्या देशाचे नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य असते, असे ते म्हणाले. इस्रायलला अमेरिकेने केलेली मदत योग्य होती, परंतु भारत-पाक प्रश्नामध्ये अमेरिकेची भूमिका नव्हती, असा दावा त्यांनी केला. ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरणावरही ठाणेदारांनी टीका केली. ट्रम्प यांना महागाई कमी करावी या अपेक्षेने अमेरिकन जनतेने निवडून दिले. पण, त्यांच्या नीतीमुळे अमेरिकेलाही फटका बसतोय. महागाई वाढत आहे आणि हे धोरण श्रीमंत धार्जिणं असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.
अमेरिकेची प्रगती ही स्थलांतरितांमुळेच शक्य झाली आहे, असे ठाणेदार यांनी स्पष्ट करत ट्रम्प सरकारच्या अँटी इमिग्रंट धोरणावर टीका केली. अमेरिकेत वैज्ञानिक, अभियंते, आणि अन्य कुशल मनुष्यबळाची आज गरज आहे. 'अमेरिका फर्स्ट' या धोरणामुळे इमिग्रंट्सना अडथळे निर्माण होतात. ही पॉलिसी बदलणं गरजेचं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.