

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक मध्य मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी वचनांची पंचसूत्री जाहीर केली आहे. ड्रग्जमुक्त नाशिक, भयमुक्त नाशिक, बेरोजगारीत गुरफटलेल्या युवकांच्या स्वप्नांना बळ, वाहतुकीच्या चक्रव्यूहातून सुटका व गोदामाईचा शाश्वत विकास या वचनांच्या पंचसूत्रीद्वारे नाशिकचा विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा 'मशाल' या चिन्हासमोरील बटन दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन माजी आमदार वसंत गिते यांनी केले आहे.
मध्य नाशिकचे नेतृत्व करण्यासाठी वसंत गिते हे सज्ज झाले आहेत. शहराचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यरत राहताना गिते यांनी वचनांची पंचसूत्री जाहीर केली आहे. ती वचने पुढीलप्रमाणे आहेत.
राज्यात गेल्या काही वर्षांत ड्रग्जमाफियांनी तरुण पिढीला नशेबाजीच्या विळख्यात ओढून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा डाव रचला आहे. या ड्रग्जमाफियांनी नाशिकला 'सॉफ्ट टार्गेट' केले आहे. त्यांना राजाश्रय लाभल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हे संकट लक्षात घेऊन वसंत गिते यांनी ड्रग्ज विरोधातील लढाईला प्रारंभ केला आहे.
'भाविकांचे शहर' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या १० वर्षांत गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यामुळे नाशिककर भयभीत झाले आहेत. यंत्रणेवरील राजकीय दबावामुळे पोलिसिंगलाही मर्यादा आल्या आहेत. यासाठी जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आगामी काळात कार्यरत रहाण्याचा मानस गिते यांनी व्यक्त केला.
'मंत्रभूमी ते तंत्रभूमी' असा प्रवास करणाऱ्या नाशिकमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवूनही तरुण- तरुणी नोकरीसाठी वणवण हिंडत आहेत. त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी आगामी काळात काम केले जाईल, असे उमेदवार गिते यांनी नमूद केले.
नाशिक शहरातील वाहतूक दिवसेंदिवस जीवघेणी होत आहे. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले, तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. द्वारका, मुंबई नाका, सारडा सर्कल यांसारखे 'ब्लॅक स्पॉट' व तेथील समस्यांचा अभ्यास करून तज्ज्ञांद्वारे निपटारा केला जाईल. शहरातील रस्ते दर्जेदार व्हावे, यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असे अभिवचन गिते यांनी दिले आहे.
धार्मिकदृष्ट्या महत्त्व असणारा कुंभमेळा २०२६-२७ मध्ये गोदाकाठी होत आहे. मात्र सध्या गोदावरीची अवस्था बिकट आहे. गोदामाईचे संवर्धन तसेच गोदाकाठचा शाश्वत विकास करण्यासाठी सुयोग्य नियोजन केले जाईल, अशी ग्वाही गिते यांनी दिली. त्र्यंबकेश्वर- नाशिक कॉरिडॉरसाठी प्रयत्न करणार असल्याचेही गिते यांनी सांगितले.