

नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी प्रारंभापासून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे गावठाण, जुने नाशिक, गंगापूररोड, कॉलेज रोड, रामवाडी, मेनरोड, भद्रकाली परिसर, इंदिरानगर आदी भागातून ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे 'विजय होणार विशाल, निशाणी आहे मशाल' हा नारा सध्या मतदारसंघात गाजत आहे.
मध्य नाशिक मतदारसंघातील उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकजुटीने रिंगणात उतरले आहेत. गिते यांनी कार्यकर्त्यांसमवेत गंगापूररोड, कॉलेजरोड, अशोक स्तंभ, रविवार पेठ, सराफ बाजार, दहीपुल, मेनरोड, सोमवार पेठ, भद्रकाली, जुने नाशिक, काठे गल्ली, द्वारका, वडाळारोड, बोधलेनगर, शिवाजीनगर, तपोवनरोड, आंबेडकर, गांधीनगर आदी परिसर पिंजून काढला आहे. नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीत शहर विकासासाठी आवश्यक असलेली गिते वचनांची पंचसूत्री मांडत आहेत. तसेच 'भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक'साठी कार्यरत राहणार असल्याचे सांगताना आगामी कुंभमेळ्यापूर्वी शहराचा चेहरामोहरा बदलल्यासाठी कार्यरत रहाण्याची ग्वाही गिते देत असल्याने मतदार प्रभावित झाले आहेत. गिते यांच्या प्रचारासाठी खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. शोभा बच्छाव, उपनेते सुनील बागूल, प्रदेश संघटक विनायक पांडे, महानगरप्रमुख विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले, प्रकाश मते, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, आदी नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत.
मध्य नाशिक विधानसभा मतदार संघातील प्रचाराला प्रारंभ झाल्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या संवाद मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. मंगळवारी आडगाव येथे शरद पवार यांच्या सभेमुळे महाविकास आघाडीच्या प्रचार मोहिमेला अधिक बळ आले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे. खा. राऊत यांनी गिते यांच्या विजयाचा पाया रचल्यानंतर ठाकरे यांच्या या सभेमुळे गिते यांच्या विजयाचा कळस रचला जाईल,अशी भावना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.