Varkari Mahakumbh : आदिवासी दिनी अजित पवारांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

पंचाळेत वारकरी महाकुंभ नारळी सप्ताह : १४० एकर मंडप, ५० लाख भाविक होणार सहभागी
Sinner Nashik
पंचाळे : अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास जमलेले भाविक.(छाया :संदीप भोर)
Published on
Updated on
सिन्नर : संदीप भोर

श्री संत गंगागिरीजी महाराज सरला बेटाच्या वतीने १७७ वा अखंड हरिनाम सप्ताह यंदा तालुक्यातील पंचाळे येथे होत आहे. शनिवारी (दि.१०) या सप्ताहाची सुरुवात होणार असून, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (Varkari Mahakumbh Narali Week has been recorded in the Guinness Book of Records as the Varkari Mahakumbh)

Summary

सप्ताहासाठी दररोज अंदाजे पाच लाख भाविक भजन आणि भोजनाचा आस्वाद घेतील. एकादशी आणि सप्ताहाच्या समारोपाला ही संख्या दुप्पट ते तिप्पट असते. त्यावरून राज्यभरातील जवळपास ५० लाख भाविक उपस्थिती लावणार असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यांतील १० हजार टाळकरी भाविकांनी या सप्ताहासाठी नोंदणी केली असून, ते यामध्ये सातही दिवस सहभागी होणार आहेत.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सप्ताहाची नोंद

सप्ताहासाठी पार्किंगसह ३०० एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे. सप्ताहस्थळी १४० एकरवर मंडप घालण्यात आले आहेत. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून या सप्ताहाची नोंद झालेली असून, प्रामुख्याने सहा महिने अगोदरपासून पूर्वतयारी सुरू आहे. शनिवारी (दि.१०) रोजी सकाळी १० वाजता शोभायात्रेने सप्ताहाची सुरुवात होणार असून, यानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सप्ताहानिमित्त भव्य कृषी प्रदर्शन

सप्ताह कालावधीत दररोज दुपारी १ ते २ या वेळेत रामगिरी महाराज यांचे श्रीमद् भगवद्‌गीतेवर प्रवचन होणार आहे. सात दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंक्तीमध्ये टँकरने आमटी व ट्रॅक्टरने महाप्रसाद वाटप होते. सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात १०० ते १५० स्टॉल थाटण्यात येणार आहेत.

लोकप्रतिनिधींचेही योगदान

अनेक शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्यातून शेतीसाठी केलेल्या पाइपलाइन सप्ताहासाठी खुल्या करून दिल्या आहेत. अनेकशेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांना फाटा देऊन जमीन सप्ताहासाठी खुली ठेवली आहे. आमदार माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांचे खास योगदान लाभले असून, खा. वाजे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात २० हजार भाविकांचा अन्नदान खर्च केला. मंडपासाठी, स्वागत कमानी यासाठी आमदार कोकाटे व माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी योगदान दिले आहे. सप्ताहकाळात आमदार माणिकराव कोकाटे हे येथे तळ ठोकून असणार आहेत.

मुघल साम्राज्यकाळात गंगागिरी महाराजांनी धर्मरक्षणार्थ समाजाचे संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन करून जनतेला अध्यात्ममार्गाला लावले. त्याकाळी आषाढ-श्रावणात उपासमारी होत असे. म्हणून आमटी भाकरीचा प्रसाद दिला. शैव व वैष्णव यांना एकत्र केले, तेव्हापासून फिरता नारळी सप्ताह सर्वधर्मीय सप्ताह नावारूपास आला.

शिवाजी महाराज तळेकर, सिन्नर, नाशिक.

महाप्रसाद शिजविण्यास २६० आचाऱ्यांचा लवाजमा

सप्ताहासाठी पाच मंडप उभारले आहेत. मुख्य भजन मंडप ३०० बाय १८० फूट असून, क्षेत्रफळ ५४ हजार स्क्वेअर फूट आहे. राहुटी मंडप महाराजांचे निवासस्थान हे १०० बाय ३० फूट असून, ३००० स्क्वेअर फूट आहे. यामध्ये किचन, दोन्ही बाजूने दर्शन रांग, रामगिरी महाराज यांचे आसन, निवासस्थान यांचा समावेश आहे. किचन मंडप हा २०० बाय १०० म्हणजे २० हजार स्क्वेअर फूट त्याचे क्षेत्रफळ आहे. शेवटच्या दिवशी आमटी केली जाणार असून, मोटारपंपाद्वारे आमटीचा उपसा करून तो टँकरमध्ये भरून भाविकांना वाटप केला जाईल. प्रसाद करण्यासाठी २६० आचाऱ्यांचा लवाजमा आहे.

डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे २५० जणांचे पथक तैनात

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सप्ताहस्थळी सिन्नर नगर परिषद, संजीवनी साखर कारखाना, कोळपेवाडी साखर कारखाना यांचे अग्निशमन बंब, पाच रुग्णवाहिका, सिन्नर, कोपरगाव, संगमनेर व संभाजीनगर येथील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे २५० जणांचे पथक तैनात ठेवले जाणार आहे. सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयासह तीन रुग्णालये, ब्लड बँकांनाही आगाऊ माहिती देऊन २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी सांगितले.

एकादशीला पाचशे पोती साबुदाणा खिचडी

शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट रोजी एकादशीच्या दिवशी दुपारी २ वाजता रामगिरी महाराज यांचे कीर्तन होणार असून, त्या निमित्त ५०० पोते साबुदाणे, २५० पोते शेंगदाणे, ३०० क्विंटल बटाटे असा साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना दिला जाणार आहे. सप्ताहाची सांगता शनिवारी (दि. १७) द्वादशीच्या दिवशी होणार असून, त्यानिमित्त सकाळी १० वाजता रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या दिवशी लाखो भाविकांना ५०० पोते साखरेची बुंदी, ७०० पोते मुरमुरे चिवड्याचा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. हा प्रसाद चक्क ३०० ट्रॅक्टरने आठ मिनिटांत भाविकांना वाटप केला जाणार आहे.

हेलिकॉप्टरने येणार गंगागिरी महाराज पादुका

गंगागिरी महाराजांच्या चरणपादुकांसह सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे शनिवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता पंचाळेत हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. या सप्ताहात देणगीरूपाने होणाऱ्या खर्चाचा सुमारे पाच कोटी रुपयांचा अंदाज संयोजकांनी वर्तविला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news