

नाशिक : Nandgaon Assembly Election | नांदगाव मतदारसंघातील शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सुहास कांदे यांच्या खर्चात 2 लाख 91 हजार 170 तसेच अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या खर्चात 1 लाख 39 हजार 18 रुपयांची तफावत आढळून आली. या तफावतीबद्दल खर्च निरीक्षकांनी उमेदवारांकडून खुलासा मागविला आहे.
नांदगाव मतदासंघातील उमेदवारांची निवडणुक खर्च विषयक पहिली तपासणी सोमवारी (दि. ११) खर्च निरीक्षक कॅस्ट्रो जयप्रकाश टी. यांच्या उपस्थितीत पार पडली. नांदगाव पंचायत समिती कार्यालय सभागृहात पार पडलेल्या बैठकीला सर्व 14 उमेदवार, प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी सुनील सैंदाणे यांनी दिली. यावेळी कॅस्ट्रो यांनी सर्व उमेदवारांच्या नोंदवह्यांची तपासणी केली. तपासणीनंतर उमेदवारांचा खर्च अहवाल निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. मतदासंघातील सर्व उमेदवारांची दुसरी खर्च तपासणी दि. १४ तर तिसरी १९ तारखेला केली जाणार आहे. यावेळी विलास महाजन यांच्यासह पथकातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.