

धुळे : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांवर सरकार प्रचंड खर्च करीत असताना, दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमाच्या सरकारी शाळा बंद पडणे चिंताजनक आहे. या हजारो कोटींच्या तरतुदींपैकी केवळ ०.१ टक्के रक्कम म्हणजेच सुमारे ३२ कोटी रुपये जरी सरकारने खर्च केली असती, तरी राज्यभरात बंद पडलेल्या १०० ते १२५ मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या नसत्या, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांनी सरकारच्या कारभारावर भाष्य केले.
धुळे जिल्ह्यातील एका हायस्कूलमध्ये 'स्मार्ट क्लासेस'च्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
न्यायमूर्ती वराळे म्हणाले की, राज्यातील शिक्षणासाठीची घटती अर्थसंकल्पीय तरतूद चिंता व्यक्त करणारी आहे. वाढत्या विद्यार्थी संख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्याच्या तरतुदींमध्ये वाढ होण्याऐवजी ती कमी झाली आहे.
केंद्र स्तरावर शिक्षणासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद पूर्वी ११ टक्क्यांच्या दरम्यान असायची. साहजिकच, वाढती विद्यार्थी संख्या पाहता हे बजेट वाढायला हवे होते. त्याऐवजी, अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी कमी झाला आहे आणि अनेक वर्षांपासून तो १३ टक्क्यांपर्यंतही पोहोचू शकलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यासारख्या कार्यक्रमांवर होणारा प्रचंड सरकारी खर्च आणि दुसरीकडे सरकारी मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणे, यांमधील विरोधाभास सांगताना एका निवासी आश्रमशाळेत योग्य सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागते.
यात दुर्दैवाने, साप चावल्यामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला आणि आणखी एका मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगत शिक्षणाशी संबंधित अत्यावश्यक पायाभूत सुविधांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.
न्यायमूर्ती वराळे म्हणाले की, विविध उपक्रमांसाठी प्रचंड निधीची तरतूद केल्याचा दावा सरकार करते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उपमुख्यमंत्री ३२ हजार कोटी रुपयांचा, तर मुख्यमंत्री ३४ हजार कोटी रुपयांचा उल्लेख करतात. तसेच, एका कॉरिडॉर प्रकल्पासाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही मी वाचले आहे. अशा खर्चाचा अगदी छोटासा हिस्सा जरी वापरला गेला, तरीही राज्यभरातील अडचणीत असलेल्या शेकडो शैक्षणिक संस्थांना नवसंजीवनी मिळू शकते असे ते म्हणाले.
न्यायमूर्ती वराळे यांनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्याचा आपला वैयक्तिक प्रवास सांगितला. प्रादेशिक माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे आपल्या करिअरमध्ये कधीही अडथळा आला नाही, उलट त्यामुळे आपला दृष्टिकोन अधिक समृद्ध झाला, असे ठामपणे सांगितले.