नाशिक : गेली ७५ वर्षे हेच सत्ताधारी अन् हेच विरोधक असल्याने, महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे शक्य झालेले नाही. आता तर राजकारण्यांनी आपली पातळी सोडली असून, 'खुर्ची' या एकमेव अजेंड्याासाठी अत्यंत हीन दर्जाचे राजकारण सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचा वापर केवळ जातीय समीकरणासाठी केला जात आहे. मात्र, स्वराज्य पक्ष फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी सक्षक्त पर्याय निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन स्वराज्य पक्षाचे संस्थापक युवराज संभाजीराजे यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहामध्ये स्वराज्य संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत बघितले नाही, असे हीन राजकारण बघावयास मिळत आहे. खुर्चीसाठी कोण, कुठून उडी मारेल हे सांगणे मुश्कील झाले आहे. 'गद्दार' हा शब्द तर झपाट्याने पुढे आला आहे. मात्र, गद्दार कोण? याचेही चिंतन करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी फोडाफोडी केली, तेच देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काँग्रेससोबत कधीही युती करणार नाही, असे ठामपणे सांगितले असतानाही त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आज काँग्रेससोबत आहेत, ही गद्दारी नाही काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी स्वराज्यचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४० किल्ले आहेत. मात्र, एका तरी आमदार, खासदाराने किल्ला चढला काय? सुवर्ण त्रिकोणात नाशिक येते मात्र नाशिकचा विकास झाला काय? कोणती कामे नाशिकमध्ये केली गेली याचा शोध घ्यावा लागेल, अशी परिस्थिती आहे. स्मार्ट सिटीने संपूर्ण नाशिक खड्ड्यात घातले आहे. पर्यटनासाठी काहीच केले नाही. मी नाशिकमधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होतो, पण मी रिंगणात उभा राहिलो नाही ही खंत नाशिककरांनी का बोलू नये, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.