

दिंडोरी (नाशिक) : पिकांची वाढ जोमदार व्हावी, यासाठी शेतकऱ्यांकडून युरीया खताची मागणी वाढली असतानाच तालुक्यात युरीयाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे वाढीव दरासाठी काही विक्रेत्यांकडून खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कृषी विभागाने लक्ष घालून युरियाचे संकट दुर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
खरीप हंगामातील मका, सोयाबीनसह कडधान्य पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांकडून युरीया खताची मागणी वाढली आहे. परंतु तालुक्यातील विक्रेत्यांकडे युरियाचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना दुकानांमध्ये चकरा मारण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाने याबाबत लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते संतोष रेहरे यांनी केली आहे
युरियाच्या ५० किलो गोणीची किंमत २४५ रुपये आहे. त्यासाठी २० रुपये भाडे घेतले जाते. त्यातच खत कंपन्या दुकानदारांना लिंकिंग म्हणून त्याच्या दुप्पट किमतीची अन्य खते, तणनाशके देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील दुकानदारांनी युरियाची खरेदी करण्यास नकार दिला आहे.
भाजीपाला व धान्य पिकांना युरिया खताची नितांत आवश्यकता आहे. मात्र, दुकानांमध्ये युरिया शिल्लक नसल्याने माघारी परतावे लागते. शासनाने शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा.
सिताराम जाधव, शेतकरी, दिंडोरी
तालुक्यात मागणीच्या प्रमाणात युरियाची टंचाई आहे. ज्यादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येईल. जिल्हास्तरावरून युरियाची मागणी करण्यात आली आहे.
नानाजी भोये, तालुका कृषी अधिकारी, दिंडोरी