

दिंडोरी : खरीप हंगामातील पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी युरियाची गरज असताना शेतकऱ्यांना तो मिळेनासा झाला आहे. त्यात कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्यातच लिंकिंग पद्धतीने डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दुहेरी संकटात शेतकऱ्याला अडकविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
खत कंपन्यांच्या लिंकिंगमुळे दुकानदारही अडचणीत सापडले आहेत. त्यांनी लिंकिंगच्या सक्तीमुळे युरिया ठेवणे बंद केले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांप्रति अधिक सजग होऊन युरियाचे संकट दूर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आह. खरीप हंगामातील मका, सोयाबीन यांसह कडधान्ये ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यांची उंची जोमाने व्हावी यासाठी शेतकरी युरियाच्या प्रतीक्षेत आहे. दिंडोरी तालुक्यात युरिया टंचाईमुळे गहू पिकाची वाढ खुंटली आहे.
खते खरेदीला दुकानदारांचा नकार
युरियाच्या 50 किलो गोणीची किंमत 266 रुपये आहे. त्यासाठी 20 रुपये भाडे घेतले जाते. त्यातच खत कंपन्या दुकानदारांना लिंकिंग म्हणून त्याच्या दुप्पट किमतीची अन्य खते, तणनाशके देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील दुकानदारांनी युरियाची खरेदी करण्यास नकार दिला आहे. युरियाचा तुटवडा असल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
शेतकरी दररोज गावातील दुकानात जातो. परिसरात जाऊन चौकशी करतो. मात्र, त्याला नकार मिळत असल्यामुळे तो नाराज होऊन शिवारात परतत आहे. त्यातच नुकत्याच लागवड झालेल्या उसाला युरिया देण्याची गरज असताना खतांचा डोस देऊ शकलेले नाहीत.
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात युरिया नसल्यामुळे माघारी परतावे लागत आहे. गहू, हरभरा, मका पिकांसह भाजीपाल्यास युरियाची आवश्यकता आहे. मात्र, दुकानात युरिया नसल्याने माघारी परतावे लागते. शासनाने शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा.
गणेश हिरे शेतकरी
दिंडोरी तालुक्यात मागणी वाढल्यामुळे युरियाची टंचाई होत आहे. जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरून युरियाची मागणी करण्यात आली आहे.
नानाजी भोये, तालुका कृषी अधिकारी, दिंडोरी