

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि. २४) घेण्यात आलेल्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२६ ला नाशिक शहरातील १५ केंद्रांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, नोंदणी केलेल्या ४ हजार ९७१ उमेदवारांपैकी १ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याचे समोर आले. केवळ ३ हजार २८६ उमेदवारांनी उपस्थिती नोंदविली.
ही परीक्षा दोन सत्रांमध्ये पार पडली. पहिला पेपर सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत घेण्यात आला. सामान्य ज्ञानावर आधारित पहिला पेपर तुलनेने सोपा व संतुलित असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. मात्र, दुसऱ्या पेपरने अनेक विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फोडला. प्रश्नपत्रिकेची अवघड पातळी आणि वेळेचे व्यवस्थापनामुळे अनेक उमेदवारांची तारांबळ उडाली. परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
इंटरनेटद्वारे कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी शेकडो जॅमर मशीन बसविण्यात आले होते. पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, काही परीक्षा केंद्र शहराच्या टोकाच्या भागात असल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रांपर्यंत पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. विविध अधिकारी, पोलिस विभागाच्या सहकार्यामुळे ही परिक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार रजपुत यांनी दिली.