

नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथे वीज पडून रवींद्र प्रभाकर बोडके (34) हा तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर नांदगाव तालुक्यात कुसुमतेल येथे शेतकरी बाळू ढवळू मेंगाळ यांच्या बैलावर वीज कोसळल्याने बैल गतप्राण झाला. कळवण येथील भेंडी गावात शांताराम साळवे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले.
जिल्ह्यात अवकाळीचा फेरा सुरूुच आहे. त्यात पुढील तीन दिवस हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अवकाळीच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरलाही अवकाळीने झोडपले आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांसह व्यापार्यांची धांदल उडाली. शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड, शालीमार, मेनरोड, पंचवटी आदी भागात पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीस खोळंबा झाला.
नाशिक शहरात पंचवटी विभागीय कार्यालयाच्या आवारातील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या वार्यामुळे रस्त्यावर कोसळल्या. तसेच पंचवटी विभागीय कार्यालयाच्या उतारावरील बच्छाव हॉस्पिटलसमोर पाणी साचल्याने तळे निर्माण झाले होते.